उस्मानाबाद, दि. १२ : जळगाव व कोल्हापूर जिल्ह्यात घडलेल्या चर्मकार मुलीवर अत्याचार प्रकरणी शासनाने फास्ट ट्रॅक न्यायालयात दावा दाखल करून आरोपी असलेल्या नराधमांना त्वरित फासावर लटकावा, अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्यावतीने जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, महाराष्ट्रात चर्मकार समाजाच्या मुलीवर कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी तालुक्यात २० वर्षीय मुलीवर अत्याचाराची घटना घडली असून जळगाव जिल्ह्यात पारोळा तालुक्यात २० वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन विष पाजून खून करण्यात आला आहे. जळगाव आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातील अत्याचाराच्या घटना घडल्या असून एका मुलीचा प्राण गेला आहे. तसेच गेल्या वर्षात अशा प्रकारच्या अनेक निंदनीय घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या मुळे या घटनेने महाराष्ट्र हादरला असून या निंदनिय घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करीत आहोत. राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे युवक प्रदेशाध्यक्ष नितीन बप्पा शेरखाने यांनी यावेळी हाथरस (उत्तर प्रदेश) घटनेची आठवण करून दिली.
सदरील निवेदनावर युवक प्रदेशाध्यक्ष नितीन बप्पा शेरखाने, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष ऍड गणपती कांबळे, जिल्हा सचिव बबनराव वाघमारे, युवक अध्यक्ष सत्यजित शेरखाने, तालुकाध्यक्ष शहाजी शेरखाने, शहराध्यक्ष पंकज नरसुडे, मार्गदर्शक रोहिदास गुजर, मार्गदर्शक नितीन सलगरे, कार्याध्यक्ष सौदागर पवार आदी समाज बांधव व पदाधिकारी उपस्थित होते.