नळदुर्ग : एस.के. गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील मौजे वागदरी येथे ऐन दिपावली पाडव्याच्या पूर्व संधेला चोरट्यानी धुमाकूळ घातला असून उपसरपंचाच्या घरातूनच पंधरा हजार रुपये व सोन्याचे गंठण तर ठाकूर यांच्या किराणा दुकानातून काही रोख रक्कम व किमती वस्तू पळविल्या असून अन्य दोन घरात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आले नाही.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दिपावलीच्या पूर्व संध्येला म्हणजे दि. १५ व १६ नोव्हेंबरच्या रात्रीच्या सुमारास वागदरी येथे चोरट्यांनी घुसखोरी करून गावाच्या उत्तरेला शेवटच्या कडेला असलेल्या उपसरपंच दत्ता सुरवसे यांच्या घरात शिरले. सर्वजण गाढ झोपेत असल्याचे पाहून घरात शोधाशोध केली असता कपाटवर ठेवलेली कपाटाची चावी त्यांच्या हाताला लागली. त्यांनी कपाट उघडून कपाटात ठेवलेले १५ हजारे रुपये रोख रक्कम व एकतोळा सोन्याचे गंठण पळविले. तर येथील भगतसिंग विजयसिंग ठाकूर यांच्या गोल्या किराणाच्या सेंटरचे कुलूप तोडून किराणा दुकानातील गल्ल्यात ठेवलेले रुपये २१ हजार रुपये व दुकानातील किंमती वस्तू मिळून एकूण अंदाजे ४० हजार रुपयाचा ऐवज चोरट्यांनी पळविले. मनोज बिराजदार यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. नाईलाजाने त्यांनी खोलीच्या बाहेरून दरवाजाजवळ भिंतीतील खुंटला अडकावून ठेवलेली चुरमुऱ्याची पिशवी घेऊन गेले.
सदर घटनेची माहिती मिळताच त्याच दिवशी सकाळी ६.३० वाजता दरम्यान नळदुर्ग पोलिसांनी घटनास्थळास भेट देवून लागलीच स्वानपथकाची मागणी केली. दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास स्वान पथकासह पोलीसांनी सदर घटनेची पहाणी केली. गावच्या उत्तरेकडील बाजूने डोंगररस्त्याने चोर पळून गेल्याची दिशा स्वानाने दखवली असून सदर घटनेची नळदुर्ग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे वागदरी येथे घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून नळदुर्ग पोलिसांनी रात्रीची गस्त वागदरी पर्यंत वाढवावी अशी मागणी होत आहे.