उस्मानाबाद, दि. 25 : 05-औरंगाबाद पदवीधर मतदार संघाची निवडणूक 01 डिसेंबर रोजी होणार आहे.या निवडणुकीत सर्व केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकाऱ्यांनी जबाबदारीने व गांभीर्यपूर्वक काम करणे अपेक्षित आहे. या कामात कोणत्याही प्रकारचे हलगर्जी होता कामा नये याची सर्व मतदान अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी उपस्थितांना दिले. 05-औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसंदर्भात मंगळवार दि.24 रोजी भूम येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत शेजारील अलमप्रभु सभागृह येथे मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन  प्रसंगी ते मार्गदर्शन करत होते.

यावेळी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, पदनिर्देशित अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मनिषा राशिनकर, अतिरिक्त पदनिर्देशित अधिकारी तथा भूमच्या तहसिलदार उषाकिरण श्रंगारे,अतिरिक्त पदनिर्देशित अधिकारी परंडा तहसिलदार अनिलकुमार हेळकर, नायब तहसिलदार तुषार बोरकर आणि सर्व मतदान अधिकारी व केंद्राध्यक्ष उपस्थित होते.

पुढे बोलताना जिल्हाधिकारी दिवेगावकर म्हणाले की, निवडणूक प्रक्रिया हे अत्यंत संवेदनशील आणि जबाबदारीची असते. त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांनी आपणास नेमून दिलेल्या मतदान केंद्राचे सर्व साहित्य तपासून ते योग्य असल्याची खात्री करून घ्यावी. आपले मतदान केंद्रावर नियोजित वाहतूक आराखड्यानुसार पथकातील सर्व सदस्य पोलीस कर्मचारी व साहित्य घेऊन मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे 30 नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रावर जावयाचे आहे. तसेच मतदान केंद्रावर एक दिवस मुक्काम असल्यामुळे आवश्यक वैयक्तिक साहित्यही सोबत ठेवावे.

 मतदानाच्या दिवशी covid-19 चा प्रादुर्भाव विचारात घेऊन सर्व मतदान केंद्रे स्वच्छ करून घेण्यात येत आहेत. तसेच प्रत्येक मतदान अधिकारी व केंद्राध्यक्ष यांच्या चाचण्या ही  घेण्यात येत आहेत. तरी आरोग्य सुरक्षेच्या अनुषंगाने मतदानासाठी मतदान केंद्रावर आलेल्या मतदारांनी मास्क लावला नसेल तर त्याला मास्क पुरविण्यात येणार व आरोग्य कर्मचाऱ्यांकडून त्यांचे थर्मल स्कॅनर द्वारे तापमान तपासणी करण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर आलेल्या मतदारांपैकी कोणत्याही व्यक्तीला covid-19 लक्षणे दिसून आल्यास

संबंधित मतदारास टोकन किंवा प्रमाणपत्र देऊन त्यास मतदानासाठी च्या शेवटच्या तासात मतदानासाठी येण्यास सांगावे मतदानाच्या शेवटच्या तासांमध्ये अशा मतदारांना मतदान केंद्रावर मतदानासाठी सुविधा पुरविण्यात यावी. असेही ही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.

मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी.पुरुष मतदार व स्त्री मतदार तसेच दिव्यांग यांच्यासाठी तीन स्वतंत्र्य रांगा व दोन मतदारामधील सामाजिक अंतर 6 फुटाचे ठेवावे.यासाठी गोल वर्तुळे चिन्हांकित करावीत.मतदान केंद्रापासून 200 मीटरचे अंतर चुना फक्की पावडरने चिन्हांकित करावे.मतदान केंद्रापासून 200 मीटरच्या आत प्रचार साहित्य असल्यास ते काढुन टाकावे.मतदान केंद्रामध्ये राजकीय पक्षाच्या नेत्यांचे फोटो किंवा चिन्हा असल्यास ते काढून टाकावे अथवा झाकून टाकावे.मतपत्रिकेतील नावांसमोरील जागेत मतदार पसंती क्रमांक अंकात लिहावयाचा आहे.ते आकडे मराठी,इंग्रजी,रोमन किंवा भारतीय घटनेतील आठव्या अनुसूचीमध्ये दिलेल्या कोणत्याही भारतीय भाषेतील अंकात लिहिण्यास मुभा आहे.भारतीय निवडणुक आयोगाच्या सुचनेनुसार निवडणुकीसाठी मतपत्रिकेवरील नोटा हा पर्याय वगळण्यात आला असल्याचे त्यांनी सांगीतले.निवडणुक नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नेमून दिलेल्या मतदान केंद्राचे सर्व साहित्य योग्य असल्याची खात्री करुन घ्यावी.

संबंधित कर्मचाऱ्यांनी साहित्य घेवून नेमून दिलेल्या वाहनांद्वारे पोलीस कर्मचाऱ्यासह 30 नोव्हेंबर-2020 रोजी मतदान केंद्रावर जावयाचे आहे.निवडणुक कामाकाजातील अधिकारी व कर्मचारी यांची सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वोपतरी काळजी घेण्यासाठी,प्रत्येाक मतदान केंद्रावर सॅनिटायझर,स्वच्छ पिण्याचे पाणी आदी व्यवस्था करण्यात यावी.तसेच सर्व मतदान केंद्राचे निर्जंतुकीकरण करुन घ्यावे.शहरीभागातील मतदान केंद्राचे निर्जंतुकीकरण नगरपालिकेने तर ग्रामीण भागातील मतदान केंद्राचे निर्जंतुकीकरण पंचायत समितीच्या आरोग्य विभागाने करुन घ्यावे,अशा सूचनाही जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी यावेळी दिल्या.

यावेळी केद्राध्यक्षांना विशेष सूचना करतांना जिल्हाधिकारी म्हणाले की,निवडणुकी संबंधीचे साहित्य ताब्यात घेताना आपणास सर्व वस्तु देण्यात आल्याची खात्री करावी.तसेच प्रत्येक मतपत्रिकेवर आयोगाने दिलेल्या विभेदक चिन्ह आणि त्यावर केंदाध्याक्षांच्या स्वाक्षरी अनिवार्य आहेत.त्याशिवाय सदर मतपत्रिका ग्राहय धरली जात नाही,याची नोंद घ्यावी.असे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी भूम तालुक्यातील आष्टा येथील मतदान केंद्राची पाहणी व तपासणी केली आणि आवश्यक फर्निचर उपलब्धता,टेबल व साहित्याची व्यवस्थित रचना,सुचना फलक याबाबत माहिती विचारली व आवश्यक सुचना केल्या.

 
Top