जळकोट : मेघराज किलजे

शंभर ते तीनशे वीज युनिट वापर असलेल्या ग्राहकांना वीजबिलात सवलत देण्याची ग्वाही उर्जामंत्र्यांनी दिली होती. मात्र आज तेच उर्जा मंत्री वीज बिलात कुठलीही सवलत मिळणार नसल्याचे सांगून वीज ग्राहकांची फसवणूक करीत आहेत. त्यामुळे वीजबील माफीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उस्मानाबाद जिल्ह्याच्या वतीने जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की,  लॉकडाऊन काळात छोटे मोठे उद्योग धंदे व व्यवसाय बंद पडले.अनेकांना आपली दुकाने बंद ठेवावी लागली. मात्र लॉकडाऊन काळात वीज दरवाढ करून राज्य सरकारने ग्राहकांना भरमसाठ वीजबिले काढली. त्याबाबत जनतेमधून रोष व्यक्त झाल्यानंतर उर्जा मंत्र्यांनी वीजबिलात सवलत देण्याची घोषणा केली होती. मात्र राज्यातील वीज ग्राहकांना वीजबिल माफीचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. त्यामुळे वीजग्राहकांसह प्रामुख्याने छोटे उद्योजक व व्यावसायिक अडचणीत आले आहेत. आघाडी सरकार वीज ग्राहकांकडून वीजबिलाची वसुली करण्याच्या मुद्द्यावर ठाम आहे. त्यामुळे आता आंदोलनाशिवाय पर्याय राहिलेला नाही.या आंदोलनात जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नवगिरे यांनी केले आहे.

 
Top