जळकोट : मेघराज किलजे
जिल्हयातील महिला बचत गटांतील महिलांची मायक्रो फायनान्सचे कर्ज व वीजबिल माफी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दि .२६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता सरचिटणीस तथा जिल्हा संपर्क प्रमुख दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी दिली आहे.
उस्मानाबाद जिल्हयातील हजारो माता भगिनींनी महिला बचत गटांच्या माध्यमातून छोटया- मोठ्या उद्योग व्यवसायासाठी मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतले आहे. कोरोनाच्या महाभयंकर संकटात सर्व उद्योगधंदे बुडालेले असल्याने कर्ज फेडणे अतिशय मुश्किल झालेले आहे. अशा परिस्थितीत मायक्रो फायनान्सचे वसुली कर्मचारी हे महिलांच्या घरी जाऊन वसुलीसाठी तगादा लावत आहेत.
सरकारने मोठया उद्योगपतींची कोट्यवधी रुपयांची कर्जमाफ केली आहेत.त्या तुलनेत महिला बचत गटांनी घेतलेले कर्ज तर खूपच छोटे आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या महिला बचत गटांचे कर्ज माफ करण्यात यावे. तसेच शंभर ते तीनशे वीज युनिट वापर असलेल्या वीज ग्राहकांना वीज बिलात सवलत देण्याची ग्वाही उर्जामंत्र्यांनी दिली होती. मात्र आज तेच उर्जामंत्री कुठलीही सवलत मिळणार नसल्याचे सांगत आहेत. लॉक डाऊन काळात सर्व उद्योगधंदे व व्यवसाय बंद पडले.
अनेकांना आपली दुकाने बंद ठेवावी लागली. मात्र वीज दरवाढ करुन राज्य सरकारने ग्राहकांना भरमसाठ वीज बीले काढली, परिणामत :वीज ग्राहक हे अडचणीत आले आहेत. त्यामुळे वीजबिल माफ करावे, या मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उस्मानाबाद जिल्ह्याच्या वतीने मनसे सरचिटणीस तथा जिल्हा संपर्क प्रमुख दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली दि .२६ ( गुरुवार) रोजी उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.
या मोर्चात जिल्हयातील बचत गटांच्या महिला व नागरीकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा संघटक अमर कदम, जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे, राजेंद्र गपाट, आबासाहेब ढवळे , जिल्हा सचिव दादा कांबळे यांचे सह सर्व जिल्हा पदाधिकारी, सर्व तालुकाध्यक्ष, सर्व शहराध्यक्ष, पदाधिकारी यांनी केले आहे.