तुळजापूर : सतीश महामुनी
तुळजापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कात्री आणि अपसिंगा परिसरातील शेतीला केंद्र सरकारच्या पाहणी पथकाने प्रत्यक्ष पाहणी केली असून नुकसानीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीच्या व्यथा या पथकासमोर मांडल्या.
सोमवार दि. 21 डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता अपसिंगा आणि कात्री या भागात या पथकाचे दोन अधिकारी पोहोचले त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तहसीलदार जिल्हा कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी आणि इतर अधिका-यांची टीम उपस्थिती होती.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून पडताळणी करणारी हे पथक येणार असल्याची माहिती यापूर्वी उपलब्ध असल्यामुळे जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासन या अधिकाऱ्यांच्या दिमतीला हजर होते. तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहावर या अधिकाऱ्यांनी दुपारी साडेतीन वाजता नुकसानग्रस्त शेतकर्यांची बातचीत केली.
याप्रसंगी माजी सरपंच हिराचंद पाटील, शंकर गोरे, संदिपान देशमुख, बलभीम जमदाडे या शेतकऱ्यांनी या पथकाला माहिती दिली. या पथकाकडून अर्चना युवराज पाटील यांच्या द्राक्ष बागेचे झालेले नुकसान पाहिले. त्याचबरोबर बलभीम जमदाडे यांच्या कांद्याचे झालेले नुकसान देखील त्यांनी प्रत्येक शेतात येवून पाहिले. याशिवाय या परिसरात शेतीची झालेले नुकसान आणि वाहून गेलेली माती यासंदर्भात माहिती दिल्यानंतर सदर पथकाला आश्चर्याचा धक्का बसला. मोठ्या प्रमाणावर पावसने शेतीचे नुकसान केल्यामुळे या भागातील शेतकरी खूप मोठ्या अडचणीत सापडला आहे. या सरकारला भरपूर मदत केल्याशिवाय या शेती व्यवसायाला पुन्हा सुरू करू शकणार नाही अशी कठीण परिस्थिती आमच्यावर आलेले आहे, अशी व्यथा माजी सरपंच हिराचंद पाटील यांनी सविस्तर पथकासमोर मांडली.
केंद्र सरकारचे पथक आल्यानंतर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये शासनाकडून मदत मिळण्याची अपेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून आले. सदर शेतकरी कोरडवाहू शेती करणारे असल्यामुळे शेतातील काळी माती वाहून गेल्याची खूप मोठी समस्या या पथकासमोर मांडत होते. सातत्याने त्यांच्याकडून माती वाहून गेल्याचे झालेले नुकसान सांगितले गेले. तसेच द्राक्ष बागायत क्षेत्राचे नुकसान झाल्यामुळे भागात शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. रात्री कामठा या भागात मोठ्या प्रमाणावर कांदा असल्यामुळे कांदा पिकाचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे यावेळी शंकर गोरे यांनी पथकासमोर सांगितले. जिल्हा कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या तुळजापूर तालुक्यातील सर्व ठिकाणची माहिती सदर पथकाला दिली आहे.
या पथकाच्या पाहणी दरम्यान शेतकऱ्यांची व्यथा ऐकताना पथकातील अधिकारी व्यास आणि यशपाल हेदेखील आश्चर्यचकित झाल्याचे चित्र दिसून आले. अत्यंत गरीब परिस्थितीत शेतकरी या भागात शेती करतो आहे याची जाणीवच या अधिकाऱ्यांना झाल्याचे दिसून आले. जिल्हा प्रशासनाने आणि तालुका प्रशासनाने नुकसानीचा अहवाल यापूर्वी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे दिलेला असल्यामुळे सदर माहितीचे अवलोकन करण्यासाठी या पथकाची नियुक्ती केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आल्याचे वृत्त आहे.