कळंब, दि. 05 : खरीप हंगामात यावर्षी वेळेत पाऊस पडल्याने कापसाचे पीक जोमात आले आहे. कवडीमोल दराने कापसाची खरेदी करण्यात येत असल्याने शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान व लूट होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्याना खासगी व्यापाऱ्यांनी लुटल्यावर शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करणार काय? असे शासन विरोधी रोष व्यक्त करणारे सवाल शेतकरी करीत आहेत.

यावर्षी तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली असली तरी वेळेत पाऊस पडल्याने खरीप पिके चांगली येऊन उत्पन्न मिळण्याची हमी आहे.तालुक्यात सोयाबीन पाठोपाठ कापूस पिकाचे उत्पन्न शेतकरी घेतात.दसरा-दिवाळीच्या तोंडावर कापूस वेचणीला उत्पादक शेतकरी लगबग करतात.दिवाळीच्या पाडव्याला शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू होणे अपेक्षित आहे.मात्र शासन प्रशासन स्तरावर अद्यापर्यत हालचाली दिसून येत नाहीत.कोरोना संसर्गाच्या महामारी संकटामुळे शासनाने टाळेबंदी केली होती. यामुळे सर्वसामान्य शेतकरी वर्ग,जनतेचे जगणे मुस्किल झाले आहे. टाळेबंदी उठल्यानंतर शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त होऊन उत्पन्न घेण्याच्या कामाला लागला आहे.

तालुक्यात प्राथमिक अंदाजानुसार पाच हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.खासगी व्यापारी कापसाला ५ हजार रुपये प्रति क्विंटल दर देऊन शेतकऱ्यांची आर्थिक लूट करीत असून ५ हजार ८२५ रुपये प्रतिक्विंटल शासनाचा हमीभाव आहे.जवळपास आठशे ते नऊशे रुपये प्रतिक्विंटल शेतकऱ्याना आर्थिक फटका बसत आहे.सध्या बहुतांश शेतकऱ्याच्या घरात कापूस आहे.त्यांना शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू होण्याची अपेक्षा आहे.

कधी मिळणार परवानगी ?

पूर्वी तालुक्यात एकही कापूस खरेदी केंद्र नव्हते ते मागच्या दोन वर्षांपासून हासेगाव ( केज) येथे साई जिनिग कापूस खरेदीच्या माध्यमातून उपलब्ध झाले आहे.गेल्यावर्षी साठ हजार क्विंटल कापूस खरेदी झाला होता. या केंद्रावर वाशी,केज,कळंब,उसमनाबाद आदी भागातून आलेल्या कापसाची खरेदी करण्यात येते.दिवाळीच्या पाडव्याला खरेदी करण्यास परवानगी मिळणे अपेक्षित होते.मात्र आद्यपर्यत परवानगी मिळाली नसल्याचे साई जिनिग कापूस खरेदी केंद्राचे संचालक मुस्ताक कुरेशी यांनी सांगितले.

 
Top