नळदुर्ग, दि. 21 : येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ला तब्बल २६७ दिवसानंतर पर्यटकांसाठी उघडण्यात आला. दरम्यान, रविवार दि. 20 डिसेंबर रोजी जवळपास दोन हजार पर्यटकांनी किल्ल्यास भेट देवून आनंद लुटला. यावेळी युनिटी मल्टिकॉन्सच्यावतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जागोजागी कोरोनाविषयक जागृती करणारे माहिती फलक लावण्यात आले होते. त्याचबरोबर प्रवेशद्वारावर प्रत्येक पर्यटकाची तापमान मोजून व सॅनिटायझर करुन किल्ल्यात प्रवेश दिला जात आहे.

कोरोनामुळे गेल्या नऊ महिन्यापासून नळदुर्ग किल्ला पर्यटकासाठी बंद होता. माञ गुरूवारी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जिल्ह्यातील पर्यटन स्थळे खुली करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना संकटामुळे पर्यटकांना ऐतिहासिक किल्ल्यातील बहुप्रतिक्षित नरमादी धबधबा पाहण्याचा योग आला नाही. पुरातत्व खात्याशी सामंजस्य करार केलेल्या युनिटी मल्टिकाँन्स कंपनीने कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर पुरेशी काळजी घेण्याच्या उद्देशाने किल्ल्यात जागोजागी फलक लावले आहेत. प्रवेशद्वारावर सँनिटायझर टनेल उभे केले आहेत.

नळदुर्ग येथील भुईकोट किल्‍ला राज्‍य संरक्षित स्‍मारक महाराष्‍ट्र यांच्या वैभव संगोपन योजनेंतर्गत सोलापूर येथील युनिटी मल्टिकॉन्स कंपनीने किल्ला संवर्धन व संगोपनासाठी घेतला आहे. किल्ल्यात युनिटीने रस्त्याची डागडुजी, रंगरंगोटी करुन सुशोभिकरण केले आहे. जागोजागी हिरवळ, शोभेची झाडे, कारंजे, रंगीबेंरगी झुडपे यामुळे किल्ल्याचे सौंदर्य वाढले आहे. 

युनिटीने लॉकडाऊनच्या कालावधीतही किल्ल्याच्या सौंदर्यात भर घालुन पावसामुळे झालेल्या नुकसानीचीही पुर्नबांधणी व मजबुतीकरण केले आहे. त्यामुळे किल्ला पर्यटकांना भुरळ घालत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करुन पर्यटकांना किल्ला पाहण्यासाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन देऊ.

- कफील मौलवी, मुख्य संचालक, युनिटी मल्टिकॉन्स

दि. १४ आँक्टोबर रोजी अतिवृष्टीने पाणी महालावरील संरक्षक  कठडे वाहून गेले होते व यामुळे नुकसान झाले होते. त्यानंतर  पुरातत्व खात्याचे सहसंचालक अजितकुमार खंदारे यांच्यासह अभियंता, वस्तूविशारद व तज्ञ असलेल्या पथकाने किल्ल्यातील नुकसानीची पाहणी करून शासनाकडे अहवाल सादर केला होता. माञ पुरातत्व खात्याने डागडूजी केली नसली तरी युनिटी मल्टिकाँन्स कंपनीने या ठिकाणी स्वखर्चाने डागडूजी केली असल्यामुळे पर्यटकांना विनासायास पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे.

पुरातत्व विभागाचे अधिकारी किल्ल्यात झालेल्या नुकसानीचे पाहणी करताना - संग्रहित छायाचित्र 



 
Top