उस्मानाबाद, दि. 10 : उप सचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या दिनांक 29 ऑक्टोबर 2020 च्या पत्रान्वये भारत निवडणूक आयोगाने दिनांक 01 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रम निर्धारित केलेला आहे. या कार्यक्रमानुसार दिनांक 17 नोव्हेंबर 2020 रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली असून अंतिम मतदार यादी दिनांक 15 जानेवारी 2021 रोजी प्रसिध्द होणार आहे. मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही अशा वंचित नागरिकांना मतदार नोंदणी, नाव दुरुस्तीसाठी भारत निवडणूक आयोगाने दिनांक 12 व 13 डिसेंबर 2020 या दिवशी विशेष मतदार नोंदणी मोहिम आयोजित करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष मोहिमेचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमांतर्गत उस्मानाबाद जिल्हयातील सर्व मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी नागरिकांकडून नांव नोंदणीसाठी अर्ज स्विकारण्यासाठी उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांना आपले नाव मतदार यादीत तपासण्यासाठी दिनांक 01 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारित प्रसिध्द करण्यात आलेली प्रारुप मतदार यादी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचेकडे उपलब्ध् करुन देण्यात आलेली आहे. जिल्हयातील सर्व मान्यता प्राप्त राजकीय पक्षांचे मतदान केंद्रस्तरीय अभिकर्ता (BLA) यांना या मोहिमेस उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आलेले आहे. या कार्यक्रमास विभागीय उपायुक्त तथा मतदार यादी निरीक्षक उस्मानाबाद जिल्हयास दिनांक 10 डिसेंबर 2020 ते
12 डिसेंबर 2020 या कालावधीत भेट देणार आहेत. सर्व नागरीकांनी मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत ज्या मतदारांची नावे मतदार यादीमध्ये नोंदविलेली नसतील त्यांनी दिनांक 12 व 13 डिसेंबर 2020 या दिवशी विशेष मोहिमे मध्ये फॉर्म नं. 6 भरुन आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदवावे व दुरुस्ती असल्यास फॉर्म नं. 8 भरुन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचेकडे जमा करावा, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आवाहन केले आहे.