नळदुर्ग, दि. 11 : सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना देण्यात येणारा पुणे येथील नातू फाऊंडेशनचा ‘सुलोचना नातू सेवावृत्ती पुरस्कार’ उमाकांत मिटकर यांना जाहीर झाला आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळातील ऐतिहासिक नातू घराण्याचे वंशज महादेव बळवंत ऊर्फ भाऊसाहेब नातू यांनी सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी तसेच उच्च सामाजिक मूल्यांचे रक्षण करण्यासाठी नातू फौंडेशनची पुण्यात स्थापना केली.आपली वैयक्तिक सारी संपत्ती त्यांनी या ट्रस्टकडे सुपूर्द केली. 1991 पासून तळागाळात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना नातू पुरस्कार देण्यात येतो.9 जानेवारीला हा कार्यक्रम औरंगाबाद येथे पद्मविभूषण डॉ.अशोकराव कुकडे यांच्या मुख्य उपस्थितीत होणार आहे.
या पुरस्कारासाठी कोणाकडूनही अर्ज मागवले जात नाहीत,महाराष्ट्रातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींच्या समितीकडून यासाठी नावे घेतली जातात,अत्यंत पारदर्शक व काटेकोर नियमांतून ही नावे निवडली जातात .ध्येयवादी वृत्तीने काम करणाऱ्या व्यक्तींची निवड पुरस्कारासाठी केली जाते.
गेल्या एक तपाहून अधिक काळ सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले उमाकांत मिटकर यांचे कार्य उल्लेखनीय आहे.त्यांच्या सामाजीक कार्यावर आधारीत ‘डिव्हाईन जस्टीस’या आत्मकथेची दुसरी आवृत्ती अल्पावधीतच प्रसीध्द झाली आहे. रोख 25000/-व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल उमाकांत मिटकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.