उस्मानाबाद, दि. 04 : जागतिक अपंग सहाय्यता दिनानिमित्त शहरातील विविध माध्यमांद्वारे जे लोक अपंगांची सेवा, सहकार्य व मदत करतात, अशा समाजसेवकांचा एका नवीन उपक्रमाद्वारे सत्कार करण्यात आला. 

उस्मानाबाद शहरातील काही रिक्षाचालक गेल्या सहा वर्षांपासून अपंगांना मोफत सेवा देतात अशा पाच रिक्षाचालकांचा सन्मानपत्र, गुलाबपुष्प व काही आर्थिक मदत देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव समाजकार्यात अग्रेसर असणाऱ्या 'विवेकानंद युवा मंडळाने' केला आहे. त्याचबरोबर उंबरे कोठा येथील नवनाथ वाचनालयाचे सचिव माणिकराव इंगळे यांचा देखील सत्कार करण्यात आला. नवनाथ वाचनालयामार्फत गेल्या अनेक वर्षांपासून इंगळे हे आपल्या उत्पन्नातील काही भाग अपंगांसाठी खर्च करतात, त्यामुळे त्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. हा अपंग दिवस त्यांच्यासाठी ज्यांनी अपंगांना प्रत्येक पावलोपावली मदत केली. याला अनुसरून विवेकानंद युवा मंडळामार्फत अशा या लोकांना प्रोत्साहन मिळावे व असेच कार्य पुढेही चालू राहावे, असा संदेश देऊन त्यांना मंडळांमध्ये सामील करण्यात आले व त्यासाठी त्यांना अशा पुढील कार्यासाठी एक छोटीशी मदत करण्यात आली. 

यावेळी विवेकानंद युवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बाळकृष्ण साळुंके, रोहन गाढवे, समन्वयक स्वप्नील देशमुख, सहसचिव महेंद्रप्रताप जाधव, प्रशांत मते, समर्थ शिरशीकर, क्रांतिसिंह काकडे, विजय कोळगे व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.



 
Top