नळदुर्ग, दि. 05 : शहरातील गोलाई-ते अक्कलकोट रोड पर्यंत होत असलेल्या महामार्गामध्ये तयार केलेल्या दुभाजकामध्ये लोखंडी जाळी लावण्यात आली आहे. त्या जाळीमुळे वाहन चालकाला संभ्रम निर्माण होत आहे. परिणामी अपघात होत आहेत. त्यामुळे दुभाजकामधील जाळी २ दिवसात काढावी अन्यथा मनसे आपल्या स्टाईलने जाळी काढेल असा इशारा शहर मनसेच्या वतीने कार्यकारी अभियंता कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम अभियंता मिटकरी, टीम लीडर महेंद्रसिंग यांना निवेदनाद्वारे देण्यात आला होता.
या लोखंडी जाळ्यामुळे दुचाकीस्वारास पलीकडे रस्त्याला जायचे झाल्यास येणारी चारचाकी गाडी दिसत नाही म्हणून अनेकवेळा या विषयावर संबंधित अधिका-याशी चर्चा झाली. मनसेच्या इशाऱ्यानंतर अधिकारी खडबडून जागे झाले आणि संबंधित विभागाने जाळ्यांची उंची कमी करण्यास शुक्रवार दि. 4 डिसेंबर पासून सुरुवात केली आहे. याबद्दल मनेसेने समाधान व्यक्त केले असून मनसेनी केलेल्या ९ मागण्या पैकी २ मागण्या पूर्ण होत आहेत व इतर मागण्या ही लवकरच पूर्ण होतील, अशी माहिती संबंधित अधिका-यांनी दिली आहे.