नळदुर्ग, दि. 26 : सक्तीची वसुली करणा-या मायक्रो फायनान्स व बँका विरोधात नळदुर्ग येथे मनसेने मोर्चा काढला होता. या मोर्चाला पोलीसानी परवानगी नाकारली होती. तरीही मनसेने मोर्चा काढल्याप्रकरणी मनसेच्या पदाधिका-यावर नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मायक्रो फायनान्स व बँका यांना सक्तीच्या वसुलीसाठी वठणीवर आणण्यासाठी व तसेच प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नळदुर्ग येथे किल्ला गेट ते बसस्थानक पर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरीही मनसेने मोर्चा काढून गर्दी जमविल्यामुळे नळदुर्ग पोलीस ठाण्यात गु.र.नं.312/2020,कलम 188,269 भा.दं. वि.कायदा प्रमाणे मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे (रा.जळकोट), जिल्हा उपाध्यक्ष अविनाश साळुंखे (रा.उमरगा), महेश जाधव (रा.तुळजापूर),जिल्हा सचिव ज्योतीबा येडगे (रा.नळदुर्ग),लोहारा तालुकाध्यक्ष अतुल जाधव(रा.लोहारा), नळदुर्ग शहराध्यक्ष अलिम शेख (रा.नळदुर्ग),शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी (रा.नळदुर्ग)यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.