नळदुर्ग, दि. 26 : वसंतनगर (नळदुर्ग) येथे गेल्या 50 वर्षापासून राहत असलेल्या धरणग्रस्त कुटुंबाना आठ अ चा उतारा तसेच मालकी हक्क (कबाला) त्वरीत मिळावे, अन्यथा दि. 30 डिसेंबर रोजी सामुदायिक जलसमाधी घेण्याचा इशारा वसंतनगर येथील 66 नागरिकांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
धरणग्रस्त कुटूंबियांनी निवेदनात म्हटले आहे की, सन 2016 पासून राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोरीधरण (कुरनुर प्रकल्प) ग्रस्त व इतर गेल्या 50 वर्षापासून स्थाईक झालेल्या लोकांना आठ अ व घराचे मालकी हक्क (कबाला) देण्याची मागणी करीत आहोत. याबाबत अनेकदा पाठपुरावाही करण्यात आला आहे मात्र अद्याप या धरणग्रस्त कुटुंबांना ते राहत असलेल्या जागेचा मालकी हक्क देण्यात आलेला नाही. सन 1966 साली कुरनुर प्रकल्प (बोरिधरण) बांधण्यात आले आहे. या धरण बांधणीसाठी जवळपस सहा लमाण तांड्यातील मोठ्या प्रमाणात राहती घरे व शेतजमीन भूसंपादन करुन घेतली होती. धरणग्रस्त नागरीक गेल्या 50 वर्षापासुन वसंतनगर येथे राहत आहेत.
सन 1966 साली राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या हस्ते या धरणाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यावेळी वसंतराव नाईक यांनी वसंतनगरसाठी 16 एकर जमीन देण्याचे जाहीर केले होते. मात्र प्रशासनाने त्याची अद्यापही अंमलबजावणी केली नाही. त्याचबरोबर ही 16 एकर जमीन वसंतनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेला हस्तांतरीत केली नाही. धरणग्रस्तांच्या प्रश्नबाबत वेळोवेळी शासननिर्णय आदेश निघालेले आहेत. त्याचबरोबर अतिक्रमण केलेल्या लोकांच्या गायरान जमिनीवरील हक्क मान्य करुन त्यांना मालकी हक्क देण्याचे आदेशही शासनाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाव्दारे घेतलेले आहेत.
या ठिकाणी राहत असलेल्या नागरीकांना त्यांच्या जागेचा मालकी हक्क नसल्याने त्यांना कुठल्याच शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आमच्या व निवेदनाची दखल घेऊन प्रशासनाला आम्हाला आमच्या जागेचा आठ अ उतारा व अखेरीस दि. 30 डिसेंबर 2020 रोजी आम्ही बोरी धरणात सामुहिक जलसमाधी घेऊन आमचे जीवन संपविणार असल्याचे येथील 66 नागरीकांनी या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर नगरसेवक निरंजन राठोड, नगरसेविका छमाबाई राठोड, फुलचंद राठोड, विनायक जाधव, माजी नगराध्यक्षा झिमाबाई राठोड, माजी नगरसेविका ललीता जाधव, सुमन जाधव, बाबु जाधव, मानसिंग राठोड, सिताराम राठोड, केशव पवार, माणिक राठोड, भानुदास राठोड, दगडू राठोड, बाबु राठोड, मोतीराम पवार, चांगदेव चव्हाण, फुलचंद राठोड, बाबु रामदास राठोड, सुधाकर राठोड, शिवाजी चव्हाण, धनसिंग जाधव, वैभव जाधव, रामजी राठोड, सुर्यकांत चव्हाण, ढाकू चव्हाण, अशोक जाधव, राजेंद्र राठोड, सुर्यकांत लक्ष्मण राठोड यांच्यासह 66 नागरिकांच्या स्वाक्ष-या आहेत.