उस्मानाबाद, दि. 06 : महिलांना एकत्र करून त्यांनी छोटे-मोठे उद्योग सुरू करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ माध्यामातून मार्गदर्शन व आर्थिक सहकार्य करण्यात येत आहे. त्यामुळे महिलांनी चिकाटीने उद्योग व व्यवसायातून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनावे, असे आवाहन महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी केले.
महिला आर्थिक विकास महामंडळ व तुळजापुर नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने तुळजापूर येथील सराया धर्मशाळेत बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू प्रदर्शन उद्घाटन कार्यक्रमांत ज्योती ठाकरे बोलत होत्या. या उद्घाटनवेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, नगरसेवक नानासाहेब लोंढे, विभागीय संनियंत्रण व मुल्यमापन अधिकारी सिध्दाराम माशाळे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी शेख, चारूशीला पाटील, लोकसंचलित साधन केंद्रांचे अध्यक्षा निर्मलाताई बनसोडे, तुळजापूर येथील जनसेवा शहरस्तरीय संघाच्या अध्यक्षा भारतबाई देवकर व सचिव अनिता काळे, माविम व नगरपालिका कार्यालयांचे अधिकारी व उद्योजक माहिला स्वयसहाय्य बचत गटातील महिला उपस्थित होते.
ठाकरे म्हणाल्या की, कोवीड सारखा महाभयकंर आजाराने आपल्याला पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे हे शिकविले. आजारापासून आपला बचाव करण्यासाठी महिलांनी S- सॅनिटायझर, M -मास्क, S - सोशल डीस्टसिंग एकमेकां पासून ठराविक अंतर ठेवणे अशा “एसएमएस (SMS) “ या त्रिसुत्रीचा मंत्र पाळला पाहिजे यासाठी महिलांनी घरातील सर्वांना स्वच्छतेची सवय लावावी असे त्या मार्गदर्शनामध्ये म्हणाल्या. कोवीड काळात माविम परिवारशी जोडलेल्या महिलांनी एक रुपया सहभाग देऊन बारा लाख निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जमा केल्याबद्दल ठाकरे यांनी राज्यातील सर्व महिलांचे कौतुक केले.
ज्योती ठाकरे यांनी प्रदर्शन पाहणी व उद्योजक महिलांशी संवाद साधला. त्यावेळी महिला बांगडी विक्री, कवड्यांच्या माळा बनविणे, खाद्यपदार्थ अशा विविध व्यवसायातून महिला तुळजापूर मध्ये आर्थिक दृष्ट्या सक्षम होत आहेत व कुटुंबाला हातभार लावत आहेत हे पाहुन श्रीमती ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी १५ बचत गटांना दीड लाख रुपयांचा फिरता निधी वाटप करण्यात आला. आयसीआयसीआय बँकेच्यावतीने बचत गटांना उद्योग व्यवसायकरीता ५ लाख ५७ हजार रुपयांच्या कर्जाचे धनादेश वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रदर्शनामध्ये उस्मानाबाद व तुळजापूर मधील बचतगटातील महिलांनी स्टाॅल लावले होते. कवड्यांच्या माळा ,विविध प्रकारचे मसाले ,फिनेल हॅन्डवाॅश, तोरण, गाडीत ठेवण्यात येणाऱ्या उशा, डेकोरेशन केलेल्या परड्या, फुटाणे, फुलदाणी, मास्क, तयार ब्लाऊज, सेव्हन फ्लेवर मधील शेवई , नूडल्स अशा वस्तू स्टाॅलमध्ये होत्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा समन्वय अधिकारी शोभा कुलकर्णी यांनी तर प्रास्ताविक विभागीय संनियंत्रण व मुल्यमापन अधिकारी सिद्धाराम माशाळे यांनी व उपस्थितांचे आभार लोकसंचलित साधन केंद्राचे व्यवस्थापक वनमाला सावंत यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माविम, सीएमआरसी व नगरपालिका कर्मचारी यांनी सहकार्य केले.