तामलवाडी : सर्जेराव गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजल्याने दि. १४ रोजी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, प्रहार संघटना यांची बैठक पार पडली.या बैठकीत सर्वांनी एकत्र निवडणूक लढवण्याचा संकल्प करु महाविकास आघाडीने वज्रमुठ बांधण्यात आली आहे.

तामलवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणूकांचा बिगुल वाजला असुन राजकीय पक्षाकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधुन भाजपावाशी झालेले नेते आपली सत्ता पुन्हा टिकवण्यासाठी प्रयत्नशिल राहतील तर भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना हे प्रमुख राजकीय पक्ष एकत्रितपणे निवडणुक लढवुन प्रयत्नाची पराकाष्ठा करतील असे चित्र दिसत आहे. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, प्रहार संघटना यांचे सरकार सत्तेवर थेट असुन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ही एकत्रित लढण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. 

त्या अनुषंगाने तामलवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी करून निवडणूक लढवण्यासाठी दि. १४ रोजी महाविकास आघाडीची प्राथमिक बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे मोजके कार्यकर्ते सोडले तर काँग्रेस, शिवसेनेचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते.महाआघाडी केल्यानंतर कोणता पक्ष किती जागा लढवणार याबाबत चर्चा झाली यामध्ये काँग्रेस सहा, शिवसेना तीन व राष्ट्रवादी काँग्रेस दोन असे प्राथमिक जागा वाटप ठरवण्यात आले. यामध्ये प्रहारला एक जागा द्यावी अशी मागणी प्रहारच्या वतीने करण्यात आली.भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी सध्यातरी महाविकास आघाडीने वज्रमुठ बांधली आहे परंतु महाविकास आघाडीत बिघाड होऊ नये यासाठीही प्रयत्न करावे लागणार आहेत असे मत मांडण्यात आले.महाविकास आघाडीची बैठक झाली. परंतु भाजपाच्या गोटात अजूनही शांतताच दिसून येत आहे.

या बैठकीस शिवसेनेचे मुकुंद गायकवाड, दत्तात्रय गवळी, अमोल घोटकर, कॄष्णा घोटकर,विजय कोंडकर, पांडुरंग लोंढे, नागेश शिंदे, काँग्रेसचे महेश जगताप,सुधीर पाटील, शिवाजी पाटील, हमीद पठाण, गुंडप्पा गायकवाड, अजिज पटेल, रविकांत गुरव, ज्ञानेश्वर जगताप,शाहीर गायकवाड, अमोल माळी राष्ट्रवादीचे शिवाजी सावंत व कार्यकर्ते तसेच प्रहारचे सचिन शिंदे,तसेच शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

राष्ट्रवादीचे नेते बैठकीस गैरहजर

काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या तीनही पक्षांची महाविकास आघाडी करून ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी दि. १४ रोजी बैठकीचे करण्यात आले होते.भाजपासोबत न जाता राष्ट्रवादीतच राहीलेले काही नेते कार्यकर्ते या बैठकीस बोलावूनही न आल्याने अनेक तर्क वितर्कांना उधाण आले असल्याचे दिसून येत आहे.

 
Top