तुळजापूर, दि. 18 : दोन आठवडयापासून तीन वर्षाच्या चिमुकलीसह एका महिलेची श्री क्षेत्र तुळजापुरातील देवीचे पुजारी विजय भोसले यांच्या प्रयत्नामुळे त्या महिलेच्या कुटूंबियांची भेट घडवून आणली आहे. सोशल मीडियावर टाकलेल्या माहितीतीवरुन महिला व मुलगी तुळजापुरात असल्याचे कळताच पुजारी भोसले यांनी  दोघींना शोधत त्यांची आपुलकीने विचारपूस करून कुटुंबीयांशी संपर्क साधला. त्यानंतर रीतसर पोलिसांच्या साक्षीने गुरुवारी सदरील महिला व चिमुकलीला त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. 

तुळजापूर येथील पुजारी विजय भोसले यांचा भाविकांचा "स्त्री शक्ती ब्रम्हचारिणी" नावाचा व्हाॅट्सअॅप ग्रुप असून या ग्रुपवर दि. 10 डिसेंबर रोजी एक २५ वर्षीय महिला तिच्या ३ वर्षाच्या मुलीसह बेपत्ता झाल्याची पोस्ट टाकण्यात आली होती. तसेच तिच्याबाबत कांही असल्यास दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले होते. हा मेसेज विजय भोसले यांनी तुळजापुरातील काही स्थानिक ग्रुपवर पाठविला. त्यानंतर दि.१६ रोजी सदरील महिला व चिमुकली तुळजापुर शहरातील कुंभार गल्ली येथे असल्याची माहिती विजय भोसले यांना मिळाली. त्यावरुन त्यांनी तातडीने कुंभार गल्लीकडे धाव घेऊन प्रथम खात्री केली. खात्री पटल्यावर सदरील महिलेच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. दरम्यानच्या काळात महिलेस, मुलीस नवीन कपडे, जेवणाची व्यवस्थाही पुजारी भोसले यांनी केली. 

मिळालेल्या माहितीनुसार सदरील महिला मागील आठ ते दहा दिवस पंढरपूर येथे राहिली व नंतर तुळजापूर येथे पोहचली. महिलेचे कुटुंबिय तुळजापुरात आल्यानंतर गुरुवारी पोलिसांसमक्ष सदरील महिला व चिमुकलीला त्यांच्याकडे सोपविण्यात आले. पुजारी विजय भोसले यांनी दाखविलेली तत्परता व यासाठी केलेल्या प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


 
Top