उस्मानाबाद, दि. 04 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि इतर मागास बहुजन कल्याण विभाग या दोन विभागाअंतर्गत देण्यात येणाऱ्या भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क,राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती तसेच व्यावसायिक पाठ्यक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता इत्यादी योजनेचे-2020-21 या शैक्षणिक वर्षातील अर्ज भरण्याची प्रक्रिया http://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर दि. 3 डिसेंबर-2020 पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत दि.31 जानेवारी 2021 आहे.संबंधित विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत ऑनलाईन अर्ज करावेत,असे आवाहन येथील समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांनी केले आहे.
शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि व्यावसायिक पाठ्यक्रमात शिक्षण घेत असलेल्या जिल्ह्यातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी विहित मुदतीमध्ये आपले शिष्यवृत्तीचे अर्ज http://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर भरून ते ऑनलाईन भरुन त्याची प्रत (हार्ड कॉपी) पद्धतीने आपल्या महाविद्यालयाकडे जमा करावी.
महाविद्यालयांनी हे अर्ज समाज कल्याण कार्यालयाकडे सादर करण्यापूर्वी अर्जाची छाननी करून शिष्यवृत्तीस पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांचेच अर्ज या कार्यालयास मंजुरीसाठी पाठवावेत.अर्जात काही त्रुटी असल्यास तात्काळ विद्यार्थ्याकडून त्रुटींची पूर्तता करून घेण्यात यावी. दिलेल्या विहित मुदतीत ही कार्यवाही पूर्ण करावी.
पल्या महाविद्यालयात प्रवेशित एकही मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्यावी ,विहित मुदतीत अर्ज सादर न केल्यास एखाद्या मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्या सामाजिक न्याय विभाग व मागास बहुजन कल्याण विभाग जबाबदार राहणार नाहीत.
ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड NPCl मॅपरद्वारे बँकेशी लिंक झाले नाहीत.अशा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत नाही.त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची 2018-19 व 19-20 या वर्षातील शिष्यवृत्ती रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा झालेली नाही त्यांनी आपले आधार कार्ड NPCl मॅपरद्वारे बँकेशी लिंक करुन आपली प्रोफाईल अद्यावत करुन घ्यावी,असेही आवाहन सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.