काटी : उमाजी गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील काटी येथे मंगळवार दि. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सतिश देशमुख व सुरेश गुंड यांच्या घरावर पहाटे एक ते दोनच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला.या घटनेत सोने, मोबाईल व रोख रकमेसह 2 लाख 93 हजार रुपयेचा मुद्देमाल  शस्त्रधारी चोरट्यांनी लंपास केला. हि घटना घडत असताना तिघाचौघानी पाहिली परंतु चोरटे हत्यारासह असल्याने कोणाचेही पुढे जाण्याचे धाडस झाले नाही. आठवडाभरातील दुसऱ्या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

            याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मंगळवारी मध्यरात्री एकच्या सुमारास सुरेश तुकाराम गुंड यांच्या घराचा दरवाजा कटावणीच्या सहाय्याने उघडून एक एलईडी टिव्ही लंपास केली. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख यांच्या घराकडे वळवला. आई-वडिलांचे मासिक असल्यामुळे बारामती, कोपरगाव आदी ठिकाणांहून पाहूणे आले होते. एकाच हॉल मध्ये जवळपास 15 जण झोपले असताना घराच्या पाठीमागून घरात प्रवेश करुन पाहुण्यांचे पंधरा हजार असलेले पाकेट,अर्धा तोळे सोने,व तीन अंड्राईड मोबाईल लंपास केले. त्यानंतर जिल्हा परिषद प्रशालेच्या समोरील सतिश देशमुख यांच्या घरावरील जिन्यातून घरात प्रवेश करुन सतिश देशमुख यांच्या आईंच्या तोंड रुमालाने आवळून त्यांच्या हातातील पाच तोळ्याच्या सोन्याच्या पाटल्या,अडीच तोळ्याच्या बांगड्या व अर्धा तोळ्याचे गळ्यातील मणी असा ऐवज लंपास केला. रात्री झालेल्या चोरीच्या घटनेत घरातील लोकांचे उशाजवळील मोबाईल लंपास केले तरी एकालाही जाग न आल्याने चोरट्यांनी गुंगीचे औषध मारले असेल का? अशा नानाविध चर्चा ग्रामस्थांमधून सुरू होत्या. या घटनेची माहिती मिळताच तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे यांनी पोलिस पथकातील आपल्या सहकाऱ्यासह प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली.त्यानंतर तात्काळ श्वान पथक व फिंगरप्रिंट पथकातील तज्ञांना पाचारण करण्यात आले होते. यावेळी काटी पोलीस ठाण्यात नागरिकांनी गर्दी करुन गावातील हातभट्टी, मटका, जुगार, आदी अवैद्य धंदे बंद करण्याची मागणी केली. यावेळी सपोनि काळे यांनी गावातील अवैध धंदे बंद करण्याचे आश्वासन दिले.

        आठवडाभरापूर्वी 19 जानेवारी रोजी येथील अभिषेक अनिल शिंदे यांच्या घरातून चार तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केले होते.त्याअगोदर मोबाईल दुकान व देशी दारूचे दुकान फोडून दारु व मोबाईल लंपास केले होते. त्याचा तपास अद्याप न लागतो तोच हि चोरीची दुसरी घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरीच्या छोट्या मोठ्या घटना नेहमीच घडत आहेत. चोरीच्या वाढत्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असून पोलिसांनी चोऱ्या रोखण्यासाठी गस्त वाढवावी आणि उपाय योजना राबवाव्यात अशी मागणी होत आहे.

         सतिश देशमुख, विक्रमसिंह देशमुख व सुरेश गुंड यांच्या फिर्यादीवरून तामलवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भादवि 457,380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि दत्तात्रय काळे करीत आहेत.

 
Top