उस्मानाबाद, दि. 07 : आमचं गाव आमचा विकास उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील दोन दिवसीय पर्यवेक्षिकांचे प्रशिक्षण नुकतेच पार पाडले. यात सन 2021-2022 चा ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्यात आला. या प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन करण्यात आले.

या प्रशिक्षणाचे प्रास्ताविक उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) नितीन दाताळ यांनी केले.ग्रामपंचायतीस 15 व्या वित्त आयोगाअंतर्गत आणि इतर स्त्रोतातून मिळणा-या अबंधित निधीचे नियोजन ग्रामस्तरावर लोकसहभागातून गावाच्या गरजा/निकड आणि प्राधान्यक्रमानुसार करावयाचे आहे.त्या दृष्टीने गावातील लोकप्रतिनिधी,अधिकारी,कर्मचारी व इतर घटकांची क्षमता बांधणी, प्रशिक्षण आवश्यक आहे. उपस्थित प्रशिक्षणार्थिनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करताना स्थानिक गरजा आणि आवश्यकता तसेच शासनाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेवून दर्जात्मक आराखडा तयार करावेत, असे आदेश डॉ.फड यांनी यावेळी दिले.

ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करताना गावातील शेतकरी, अनु.जाती/जमाती, महिला, युवक, युवती, महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे शासकीय अधिकारी/कर्मचारी, ग्रामस्थ, स्वयंसेवक आदी घटकांची विविध स्तरावर विचार विनिमय करावयाचा आहे. या सर्व घटकांच्या सहभागाने प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये तीन दिवसांची लोकसहभागीय नियोजन प्रक्रिया राबविण्यात यावे, लोकसहभागीय नियोजन प्रक्रियेसाठी आवश्यक असणा-या क्षमता बांधणीसाठी या प्रशिक्षणाचा उपयोग होऊन आराखडे दर्जेदार होण्यास मदत होणार आहे, असेही यावेळी डॉ.फड म्हणाले.

 
Top