तामलवाडी : सर्जेराव गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पडले असुन चारही प्रभागामध्ये नागरीकांनी उत्स्फुर्तपणे मतदान केले आहे.सर्व प्रभागाचे सरासरी ८०℅ मतदान झाले असून दहा उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून सोमवारच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तुळजापूर तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या तामलवाडी ग्रामपंचायत निवडणूक ही अतिशय उत्साहात व शांततेत पार पडली.शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यानी महाविकास आघाडी करुन सर्वधर्मसमभाव ग्रामविकास आघाडी करून सर्व तरूण मतदार रींगणात उतरवुन भाजपा प्रणीत एकता ग्रामविकास पॅनलला तगडे आवाहन दिले. एकता पॅनलच्या गोटात सोसायटी चेअरमन, सरपंच, पंचायत समिती सदस्य, जि. प. सदस्य, बाजार समितीचे संचालक अशी तगडी फौज असताना महाविकास आघाडीने नवखे उमेदवार मैदानात उतरवुन भाजपाला सळो की पळो करून सोडले.
दि.१५ रोजी सकाळी ७.३० वा. मतदानाला सुरुवात झाली सकाळी ९ वाजेपर्यंत बुथवर तुरळक गर्दी दिसून येत होती. दि. १५ रोजी संक्रातीनंतरचा वाण लुटण्याचा कार्यक्रम असल्याने नंतर महीलांची रांग दिसु लागली. प्रत्येक वर्षीपेक्षा यावेळी मतदारांनी एक वेगळ्याच उत्साहाने उत्स्फुर्तपणे मतदान केले. प्रभाग क्रमांक १ मध्ये ८११ पैकी ६५१, प्रभाग क्रमांक २ मध्ये ८१३ पैकी ६९७, प्रभाग क्रमांक ३ मध्ये ६०२ पैकी ५२३, तर प्रभाग क्रमांक ४ मध्ये ८४८ पैकी ६७६ महीला व पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला .प्रभाग क्रमांक ३ व ४ या प्रभागातील लढतीकडे तालुक्याचे लक्ष लागले असल्याने दि. १८ रोजींच्या निकालाची आता सर्वांना प्रतिक्षा करावी लागणार आहे. मतदान शांततेत पार पाडण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.