तुळजापूर, दि. १५ : डॉ. सतीश महामुनी
शेकडो किलोमीटरचा प्रवास करून तुळजापूर तीर्थक्षेत्री तुळजाभवानीचे दर्शन घेऊन येणाऱ्या भाविकांना तुळजापूर येथील नवीन बस स्थानकाचे अवस्था पाहिल्यानंतर येथील कामाबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या नवीन बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर मातीचे मोठे ढिगारे आणि बांधकामाची पडलेले साहित्य यामुळे बसस्थानकाचे सौंदर्य हरपले आहे.
बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर पडलेल्या बांधकामाचे साहित्य आणि मातीचे ढिगारे जलवाहिनीचे पाईप यामुळे मध्यवर्ती बस स्थानकाच्या प्रवेशद्वारा मध्ये प्रवेश करता येत नाही. ज्या बाजूने वाहनांचा प्रवेश केला जातो तेथून भाविक भक्तांचा प्रवेश होत आहे. दर्शनी प्रमुख ठिकाणी अतिक्रमण करून हॉटेल आणि व्यावसायिकांनी आपली दुकाने मांडली असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे प्रवेश करण्यासाठी रस्ता शिल्लक राहिलेला नाही. याप्रकरणी संबंधित व्यावसायिकांना नोटिसा देऊन तात्काळ जागा खाली करून प्रवेश द्वार सुशोभित करण्याची भाविकांची मागणी आहे.
याच मार्गावर जाणाऱ्या गटारीचे काम अपूर्ण असल्यामुळे गटारातील सर्व पाणी रस्त्यावर थांबलेले असते. त्या थांबलेल्या गटारीच्या पाण्यामधून भाविकांना बसस्थानकामध्ये आत मध्ये प्रवेश करणे आणि बाहेर पडणे करावे लागत आहे. हीदेखील मोठी शोकांतिका दिसून येते तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी असणाऱ्या बसस्थानकाची अशाप्रकारची दुर्दशा अन्य ठिकाणी पाहावयास मिळत नाही, अशी प्रतिक्रिया भाविकांनी दिली आहे.
यासंदर्भात राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित कार्यालयाचे पत्र व्यवहार करून सदर दुर्दशा दूर करण्यासाठी आणि बसस्थानकाचे सुशोभीकरण करण्यासाठी लक्ष देण्याची गरज आहे. राज्य परिवहन महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी येथील प्रशासनाला सहकार्य करतात की नाही अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झाला आहे. वेगवेगळ्या यात्रा शारदीय नवरात्र महोत्सव आणि बारा महिने राज्य परिवहन महामंडळाच्या बस मधून भाविक प्रवास करतात. त्यामुळे उस्मानाबाद विभागांमध्ये नव्हेतर मराठवाड्यामध्ये सर्वाधिक आर्थिक उत्पन्न देणारे बस स्थानक म्हणून तुळजापूरचा उल्लेख आहे. मात्र भाविकांना परिवहन महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या सुविधा अत्यंत अपुऱ्या आहेत नव्याने बांधण्यात आलेल्या बसस्थानकाची अवस्था पाहिल्यानंतर येथील येथील प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत अनेक प्रश्न निर्माण होतात.
येथील जुन्या बसस्थानकामध्ये सर्वत्र खड्डे आणि मातीचे ढिगारे होऊन मातीचे साम्राज्य पसरलेले आहेत. तीच अवस्था नवीन बसस्थानकामध्ये देखील झालेले आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय अधिकाऱ्यांनी दोन्ही बसस्थानकाच्या स्वच्छता आणि परिसर डांबरीकरण करण्याचा प्रस्ताव तातडीने देऊन कायमस्वरूपी दोन्ही बस स्थानकाची स्वच्छता ठेवण्याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
या दोन्ही बस स्थानकाची स्वच्छता आणि सुशोभीकरण करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी नगर परिषद प्रशासन तसेच परिसरातील व्यवसायिकांनी सहकार्य करण्याची भूमिका घेतली पाहिजे. शहराचा लौकिक वाढविण्यासाठी बसस्थानकाची सौंदर्य अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र याकडे व्यापारी नगरपरिषद आणि बस स्थानक प्रशासन यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.