उस्मानाबाद, दि. 03 : प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सावित्रीबाई फुलेंनी महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. त्यांच्या कर्तृत्वामुळेच स्त्री शिक्षणाचा जागर झाल्याचे मत उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी व्यक्त केले.
उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सर्वजनिक सभागृहात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, श्रीमती विजयश्री फड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे, जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयुष आयुष विभागाचे डॉ. जी. आर.परळीकर,प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. ए. बी. मोहरे, महिला बाल बालविकास चे जिल्हा कार्यक्रम अधिकारी बी.एच. निपाणीकर सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सहाय्यक मधुकर कांबळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि आणि पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कनिष्ठ भूवैज्ञानिक मेघा शिंदे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा आढावा सभागृहासमोर मांडला. तर अशा कार्यकर्त्या श्रीमती गुंजकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर आधारित कविता सादर केली.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्ही. वडगावे यांनी फुले यांच्या जयंतीनिमित्त विचार मांडले ते म्हणाले,जिल्हा परिषदेतील महिलांनी आजच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून स्वयंस्फूर्तीने रक्तदान शिबिर आयोजनाची संकल्पना पूर्ण केली. मुळात महिला या आपल्या शरीराची व्यवस्थित काळजी घेत नाहीत त्यांचे वजन कमी असणे, रक्ताचे प्रमाण कमी असणे,अशा समस्या थोड्या अधिक प्रमाणात जाणवतात. जिल्हा रक्तपेढीत रक्तदानाची कमतरता आहे याची जाणीव झाल्यानंतर महिलांनी रक्तदान शिबीर घेण्याचा संकल्प केला. त्यांची प्रेरणा निश्चितच आगामी काळात एक जनजागृतीचा प्रयोग म्हणून कौतुकास्पद आहे. अशा शब्दात रक्तदान शिबिर घेणाऱ्या महिला अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव केला.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा यावेळी बोलताना म्हणाल्या की, सावित्रीबाई फुले यांनी प्रतिकूल परिस्थितीत स्त्रियांना शिक्षण मिळावे यासाठी पुढाकार घेतला. वेळप्रसंगी समाजातील काही घटकांचा विरोध पत्करून, महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली केली आणि त्यांच्यामुळेच आज माझ्यासारख्या महिला भगिनी मोठ्या पदावर विराजमान झाले आहेत. त्यांच्या कर्तृत्वामुळेच स्त्री शिक्षणाचा जागर झाल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक,सूत्रसंचालन शिक्षणाधिकारी (विस्तार) एस.व्ही.कुंभार यांनी केले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद येथील वरिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांसह महिला अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.