नळदुर्ग, दि.२९ : 
येथील नगरपालिकेच्या विविध विषय समीतींच्या सभापतींची बिनविरोध निवड करण्यात आली असून यामध्ये महाविकास आघाडी गटाला तीन तर सत्ताधारी गटाला एक सभापतीपद मिळाल्याने आता उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काय परिणाम होणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.


गुरुवार दि.२८ रोजी पालिकेच्या सभागृहामध्ये पीठासन अधिकारी तहसीलदार गणेश माळी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होवून या बैठकीमध्ये सर्वानुमते विविध विषय समीतींच्या सभापतींची निवड करण्यात आली आहे. तर नगराध्यक्षा श्रीमती रेखाताई जगदाळे यांच्या उपस्थीतीमध्ये ही निवड करण्यात आली आहे. यामध्ये सत्ताधारी गटाला केवळ एका सभापती पदावर समाधान मानावे लागले आहे तर महाविकास आघाडीला तीन सभापतीपद मिळाले आहे. यामध्ये बांधकाम सभापती म्हणून नगरसेवक बसवराज धरणे यांची निवड करण्यात आली आहे तर महीला व बालकल्याण सभापती सौ. छमाबाई राठोड तर स्वच्छता व अरोग्य सभापती दयानंद बनसोडे यांची निवड करण्यात आली आहे तर सत्ताधारी गटाचे सौ. सुनंदा जाधव यांना पाणीपुरवठा सभापती पद मिळाले आहे. 

दरम्यान यावेळी सर्व सभापतींचा सत्कार सभागृहातील नगरसेवकांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना महाविकास आघाडीचे गटनेते नय्यर जहागिरदार म्हणाले की, आमदारा राणा जगजितसिंह पाटील, जिल्हा परिषद सदस्य बाबुराव चव्हाण व जेष्ठ नेते नरेंद्र बोरगावकर यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या सर्वच नगरसेवकांनी शहराच्या विकासासाठी एकमताने या सभापतींची निवड केली आहे. शहराच्या विकासासाठी कोणतेही राजकारण न करता शहर विकासाचा हा एकमेव मुददा समोर आसल्या कारणाने आम्ही सभागृहात विविध विषय समीतींच्या सभापतींची निवड बिनविरोध केली आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र मिळून शहराचा विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत असे ही यावेळी श्री जहागिरदार यांनी म्हटले आहे. 

यावेळी सभागृहात नगरसेवक नितीन कासार, उदय जगदाळे, शहेबाज काझी, निरंजन राठोड, बसवराज धरणे, महालिंग स्वामी, विनायक अहंकारी, मुश्ताक कुरेशी यांच्यासह महीला नगरसेवक सौ. आंबूबाई दासकर, सौ. सुमनताई जाधव, श्रीमती काझी, श्रीमती कुरेशी आदी उपस्थीत होते. यावेळी सत्कार समारंभाच्या वेळी माजी नगरसेवक किशोर नळदुर्गकर, संजय जाधव, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, पत्रकार तानाजी जाधव, सुनिल गव्हाणे आदी उपस्थीत होते.
 
Top