जळकोट,दि१८ : मेघराज किलजे
तुळजापूर तालुक्यातील इटकळ गावाच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाच्या ग्राम विकास पॅनलने काँग्रेस समर्थक महाविकास आघाडीचा धुव्वा उडवीत एकूण ९ पैकी ९ जागावर एकतर्फी विजय प्राप्त करत काँग्रेसच्या दहा वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावला. ग्राम विकास पॅनलच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत विजयाचा आनंद साजरा केला.
दि.१५ रोजी झालेल्या मतदानात ८४.९२टक्के असे विक्रमी मतदान झाल्याने दि. १८ रोजीच्या मतमोजणीकडे तालुक्याचे लक्ष लागून होते. यावेळी सकाळी ८ वाजल्यापासून तुळजापूर येथील तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाबाहेर शेकडो कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केल्याने महाविद्यालय परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
प्रभाग एक मधून अमोल दौलतराव पाटील (विजयी) यांना ३१५मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार समीर जब्बार मुजावर यांना १५४मते मिळाली. तर रंजना श्रीकृष्ण मुळे (विजयी) यांना ३००मते मिळाली. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार वंदना राम मंडलिक यांना १६९ मते मिळाली. राजश्री राहुल बागडे (विजयी) यांना २९३ मते मिळाली. त्यांच्या प्रतिस्पर्धी बबिता नागेश क्षीरसागर यांना १७०मते मिळाली.
प्रभाग दोन मधून फिरोज नजीर मुजावर(विजयी) यांना ३०१ मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी अझर मुजावर यांना २३७ मते मिळाली. नजीर यासीन शेख (विजयी) यांना २८१ मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी अब्दुल काशीम शेख यांना १७५ मते मिळाली. तर सविता महादेव सोनटक्के (विजयी) यांना २७७ मते मिळाली. त्यांच्या प्रतिस्पर्धी भारतबाई भीमराव लकडे यांना २२२ मते मिळाली.
प्रभाग तीन मधून पद्माबाई काशिनाथ लकडे (विजयी) यांना ३२४ मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी अनिता माशाळकर यांना २१७ मते मिळाली. तर साहेबा अमृता क्षीरसागर (विजयी) यांना ३१६ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी केशव निवृत्ती गायकवाड यांना २२४ मते मिळाली. खातुनुबी बाबुलाल मकानदार (विजयी) यांना ३२४ मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी बशिराबी खुदादे यांना २०९ मते मिळाली.
विजयी उमेदवारांनी निवडणूक निकालानंतर आनंदोत्सव साजरा करताना जनतेने दिलेल्या विजयी कौलाबद्दल आभार व्यक्त केले. तसेच आता जबाबदारी वाढली असून जनतेचा विश्वासास तडा जाऊ देणार नाही. वचननामा आता विकासकामांत परावर्तीत करणे महत्वाचे असून आगामी काळात गावच्या विकासाचे राजकारण करणार आहे. राजकीय मतभेद विसरून सर्वाना सोबत घेतले जाईल, अशी प्रतिक्रिया इटकळ ग्रामविकास पॅनलचे प्रमुख अरविंद पाटील दिली.