मुरूम, दि. १२  : संपूर्ण जिल्हयासह लगतच्या कर्नाटकातील जिल्ह्यात मार्गशीर्ष महिन्यातील अमवस्या ही वेळामवस्या म्हणून परिसरातील सर्व शेतकरी मोठ्या उत्साहाने हा सण साजरे करतात. मुळात हा सण कर्नाटकातील असून त्याला वेळीअवमस्या म्हटले जाते. त्याचा मराठी अपभ्रंश वेळअमवस्या, वेळामवस्या, यळवस झालेला आहे. 

मुरुमकर कोठेही असोत या दिवशी आपल्या शेतात सहकुटुंब येतात. हा वेळअमवस्या सण मोठया भक्ती भावाने शेतकरी बांधव साजरा करताना दिसून येत होते. सध्या शेतात गहू, ज्वारी, तुर व हरभरा मोठ्या प्रमाणात आलेला असल्याने शेतात गव्हाच्या ओंब्या, हरभऱ्याचे डहाळे, वटाण्याच्या शेंगा, ऊस, बोरे, तुरीच्या शेंगा असा रानमेवा खाण्यासाठी मुबलक प्रमाणात आला आहे. आज हौसी लोक मोहळाचीही शिकार करतात. थंडी अधिक पडल्यास मधाचा अस्वाद विरळच. 

आंबीलाच्या चवीची वाटतर बारा महिने पाहिली जाते पण मातीच्या बिंदगीतली आंबील तर अमृततुल्य म्हणावे लागेल. आदल्या रात्री ' माय ' रात्रभर जागून डालभर स्वयपाक करते आणि सकाळी बैलगाडी सजवून बळीचं कुटुंब शेताकडं जातं. शेतकरी राजा आपल्या शेतात एक खोप तयार करून त्याच ठिकाणी धान्याची आणि मांडलेल्या पांडवांची पूजा करून एका अर्थाने वनराईची भक्तीभावाने सहपत्नीक पूजा करतो. या पुजेसाठी नैवाद्यही खास त्यामध्ये शेंगदाण्याचे लाडू, बोरे, जांभ, हरभऱ्याची ओली भाजी, ताक, लसूण व भाकरीच्या पीठापासून तयार केलेले अंबील, विविध भाज्या एकत्र करून तयार केलेली भज्जी आणि ज्वारी, गहू, बाजारीचे उंडे याचा यात समावेश असतो. 

गोड पदार्थ म्हणून तिळगुळाची पोळी आणि गव्हाची खीर असते. त्याचप्रमाणे काही ठिकाणी पांढरी ज्वारी सडून तयार केलेला आंबटभात ही असतो. आंबील वाटीत घेऊन शेतकरी भाऊ-भाऊ , पिता-पुत्र, आजोबा-नातू आदींसह पुजेभोवती प्रदिक्षणा घालतात. तसे करताना " चोर चोर चांगभला, पाऊस आला घरला पळा, हरहर महादेव, इडापिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे." अशा घोषणा दिल्या जातात. या पुजेचे वैशिष्टये म्हणजे यात कुठलेच पौराहीत्य, आरत्या नसतात. उंड्यावरच ज्योत पेटवली जाते. मंत्र नसतात की कोणतीच पोथी नसते. सगळी पुजा स्वत: बळीराजा करतो. 

हा सण साजरा करताना त्याच्या चेहऱ्यावर मालाच्या भावाची चिंता नसते की, उत्पन्नाची. दुपारच्या वेळी ' उतू दवडलं ' जातं. म्हणजे शेवाया एका छोट्या बोळक्यात घालून गोवऱ्यांवर शिजवल्या जातात. त्याचे उतू घालवतात. ज्या दिशेला उतू जाते त्या दिशेला चांगले पीक येणाऱ्या काळात येईल, अशी भावना असते. दुपारी थोडीशी वामकुक्षी हानून सायंकाळी कडब्याच्या पेटत्या पेंड्या हातात घेऊन ' हेंडगा ' खेळला जातो. पेटती पेंडी घेऊन शेताला प्रदक्षणा घातली जाते. याने पीकावर रोगांचा प्रादूर्भाव होत नाही, अशी धारणा आहे. 

शेतकरी सर्वसामान्यपणे या दिवशी नातेवाईक, मित्र परिवाराला वनभोजनासाठी आग्रहाने निमंत्रण देतो. अगदी दूरवरून जाणाऱ्या अनोळख्यालाही हाळी देऊन बोलावतात. जेवणाचा आग्रह धरतात, जेवण केलेले असल्यास आंबील दिले जाते. वेळामवस्येच्या पूर्वसंध्येपासूनच शहरात मुक्कामाला येणाऱ्या लोकांनी एस.टी.बसला प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.  काही रोडवरचे शेतकरी बस थांबवून चालक-वाहकास आंबील देतात. मुरूम शहरात अघोषीत संचारबंदी असते. शहरातील रस्त्यावर चिटपाखरूही नव्हते. वर्षातला कोणताही सण शहरात एवढा ठसा उमटवू शकत नाही जेवढा वेळामवस्या उमटवते.
 
Top