जळकोट,दि.२१ मेघराज किलजे: राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण असणाऱ्या व संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या तुळजापूर तालुक्यातील जळकोट ग्रामपंचायतीच्या  निवडणुकीत गेल्या वीस वर्षापासून एकहाती सत्ता असलेल्या भारतीय जनता पार्टीचे गणेशराव सोनटक्के यांच्या बालेकिल्ल्याला जबरदस्त हादरा देत जळकोट ग्रामपंचायतीच्या अभेद्य किल्ल्यावर बहुजन विकास आघाडीने अकरा जागा मिळवून हा किल्ला सर केला. सोनटक्के यांची  वीस वर्षांपासून असलेली सत्ता संपुष्टात आणली.

जळकोट ग्रामपंचायत गणेश सोनटक्‍के यांचा बालेकिल्ला समजला जात होता. गेल्या वीस वर्षापासून विरोधकांना ते नामोहरम करत होते. गेल्या चार निवडणुकीत एक हाती सत्ता आणण्यात सोनटक्के यशस्वी ठरले होते. कोरोना काळामुळे मुदतवाढ मिळालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. यात राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या व संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या जळकोट ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. या निवडणुकीत मागील अनेक निवडणुकीचे रेकॉर्डब्रेक मोडले  गेले. न भूतो न भविष्यती अशी निवडणूक पहावयास मिळाली.

 महाराष्ट्र राज्यात सत्तारूढ असलेल्या महाविकास आघाडीचा प्रयोग ग्रामपंचायत निवडणुकीत करण्यात आला. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी एकत्रित येऊन बहुजन महाविकास आघाडी या नावे पॅनल तयार करून मैदानात उतरवले होते. याचे नेतृत्व काँग्रेसचे अशोकराव पाटील गजेंद्र कदम राजकुमार पाटील, राष्ट्रवादीचे महेश कदम, शिवसेनेचे कृष्णात मोरे , यशवंत कदम व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रशांत नवगिरे यांनी केले तर भाजपाचे गणेशराव सोनटक्के यांनी ग्रामविकास पॅनलद्वारे पाचव्यांदा आपली टीम मैदानात उतरवली होती. 

अत्यंत अटीतटीची लढत  दोन पॅनलमध्ये पाहावयास मिळाली. दोन्ही पॅनल कडून प्रचारात कुठेही कमतरता ठेवण्यात कसर केली नव्हती. बहुजन महाविकास आघाडीचे अशोकराव पाटील यांनी ही माझी शेवटची निवडणूक आहे. आपण पाच वर्षांची संधी द्या. गावात विकासकामे करू. असे जाहीर सभेत केलेल्या भावनिक आव्हानाचा महाविकास आघाडीला फायदा झाला. नव्या वार्ड रचनेचा फटका ग्रामविकास पॅनलला बसला. सत्ताधारी यांच्यावर असलेल्या नाराजीचा सुर मतपेटीद्वारे मतदारांनी दाखवून दिला. गणेश सोनटक्‍के यांच्या राजकीय इतिहासात जळकोट ग्रामपंचायत हा अभेद्य किल्ला मानला जायचा. हा अभेद्य किल्ला सर करण्यासाठी बहुजन विकास आघाडीने अत्यंत चतुराईने प्रचार केला. 

शेवटच्या क्षणापर्यंत प्रचारावर असलेली पकड कायम ठेवली. सोनटक्के यांच्या अभेद्य किल्ल्याला जबरदस्त हादरा देत या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने १७ पैकी११ जागा जिंकून हा बालेकिल्ला ताब्यात घेण्यात यशस्वी ठरला. 
सोनटक्के यांच्या ग्रामविकास पॅनेलला सहा जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत ग्राम विकास पॅनलच्या वार्ड क्रमांक दोन मधून सौ. रेखा संजय माने व  वार्ड क्रमांक ३ मधून सौ. शोभा संजय अंगुले या दोन माजी  महिला सरपंच विजयी झाल्या तर, सोनटक्के यांचे सुपुत्र ॲड. आशिष सोनटक्के वार्ड क्रमांक सहा मधून पराभूत झाले. बहुजन महा विकास आघाडीचे पॅनल प्रमुख, काँग्रेसचे अशोकराव पाटील हे स्वतः रणमैदानात वार्ड क्रमांक पाच मधून उतरुन विजयश्री खेचून आणली. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष  प्रशांत नवगिरे वार्ड क्रमांक चार मधून  विजयी झाले .निवडणुकीतील विजयी उमेदवारांचे नावे असे- वार्ड क्रमांक -१ गजेंद्र हरिदास कदम,सौ. राजश्री नामदेव कागे, वार्ड क्रमांक -२ सलीम वकील जमादार,सौ. रेखा संजय माने,सौ. गुरुदेवी रेवणसिद्ध दरेकर, वार्ड क्रमांक- ३ सय्यद राजाबाई तांबोळी,सौ. शोभा संजय अंगुले,सौ. उज्वला बसवंत भोगे, वार्ड क्रमांक -४ प्रशांत प्रकाश नवगिरे,सौ. श्रीदेवी बसवंत कवठे,सौ. अंजली अनिल  छत्रे, वार्ड क्रमांक - जीवन लिंबाजी कुंभार, अशोकराव पुंडलिकराव पाटील,सौ. सुरेखा राजशेखर माळगे, वार्ड क्रमांक - अंकुश मल्‍हारी लोखंडे, कल्याणी बसू साखरे,सौ. दीपा महेश कदम  हे उमेदवार विजयी झाले. 

निवडणुकीचा निकाल लागताच काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व मनसेच्या कार्यकर्त्यांनी व विजयी उमेदवारांनी अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून , जेसीबीद्वारे गुलालाची उधळण करून मोठ्या जल्लोषात विजयोत्सव साजरा केला.
 
Top