उस्मानाबाद, दि. 12 : नळाला पाणी न येणे तसेच सव्वा कोटी रुपये खर्चून तयार केलेला रस्ता महिनाभरात खराब झाल्यामुळे बेंबळीतील (ता. उस्मानाबाद) येथील नागरिकांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला आहे. यासंदर्भात तक्रारींचा निपटारा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले असतानाही संबंधित यंत्रणांनी काहीही हालचाल केलेली नाही. यामुळे नागरिकांनी मतदानावरील बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्धार केला आहे.
बेंबळी येथील छत्रपती शिवाजी चौक परिसर, टेकडी परिसर, धनगर गल्ली, अण्णाभाऊ साठे चौक परिसर या भागातील सुमारे ५०० कुटुंबांना नळातून पाणी मिळत नाही. त्यांना पिण्यासाठी एका घागरीला १० रुपये तर वापराच्या पाण्यासाठी दोन ते तीन रुपये प्रती घागर खर्च करावे लागत आहेत. तसेच येथे सार्वजनिक बांधकाम विभागाने छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मल्लीकार्जुन मंदिरपर्यंत सव्वा कोटी रुपये खर्चून रस्ता तयार केला आहे. मात्र, हा रस्ता तयार केल्यापासून एका महिन्यात उखडून गेला आहे.
सद्यस्थितीत या रस्त्याची मोठी दूरवस्था झाली आहे. यामुळे नळाला नियमित शुद्ध पाणी सोडणे व रस्त्याची पुनरबांधणी करावी, या मागणीसाठी छत्रपती शिवाजी चौक परिसर, टेकडी परिसर, धनगर गल्ली, अण्णाभाऊ साठे चौक परिसर या भागातील नागरिकांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकला. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात संबंधित यंत्रणेला समस्येचा निपटारा करण्यासाठी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना प्राधिकृत केले. तरीही यासंदर्भात गटविकास अधिकारी व इतर यंत्रणांकडून काहीही हालचाल झालेली नाही. यामुळे संबंधित ग्रामस्थांनी बैठक घेऊन बहिष्काराचा निर्धार कायम ठेवला आहे.
समस्या न सुटल्यामुळे ग्रामस्थांचा बहिष्कार कायम आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही पंचायत समिती व इतर विभागानीही प्रतिसाद दिला नाही. यामुळे मतदानावरील बहिष्कार कायम ठेवत असल्याचे येथील मारुती सोनटक्के यांनी सांगितले.