काटी : उमाजी गायकवाड 

कर्नाटक राज्याच्या सिमेलगत लातूर, उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यात अनेक वर्षांपासून वेळ अमावस्या सण साजरा करण्याची परंपरा असून त्याच रुढी परंपरेनुसार तुळजापूर  तालुक्यातील काटीसह परिसरातील सावरगाव, केमवाडी, वडगाव (काटी), गंजेवाडी, दहिवडी, सुरतगाव, तामलवाडी, पिंपळा, माळुंब्रा, सांगवी (काटी), मसला (खुर्द), मंगरुळ, कुंभारी, खुंटेवाडी आदी  परिसरातील गावांत मंगळवार दि.  (12 ) रोजी दर्शवेळ अमावस्येचा (यळवस) सण उत्साहात साजरा करण्यात आला. 

यंदा पाऊस चांगला झाल्याने रब्बी हंगामातील पीके डोमदार असून यंदा या कालावधीत अनेक गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून सर्व पॅनलचा प्रचार शिगेला पोहोचला असून या सणाच्या निमित्ताने काही ठिकाणी एकमेकांच्या शेतात जाऊन मतदारांशी संपर्क साधून  सहवनभोजनाचा आनंद घेत जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. त्यामुळे यंदाच्या वेळ अमावस्येला वेगळाच रंग होता.

महालक्ष्मी सणा एवढेच महत्त्व मार्गशीर्ष महिन्यात येणा-या वेळ अमावस्या सणाला आहे. यंदा  कोरोनाच्या आणि निवडणुकांच्या पार्श्र्वभूमीवर वेळ अमावस्या सणावर परिणाम होईल असे वाटत असतानाच कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट झाल्याने व काही दिवसांपासून सर्व व्यवहार सुरळीत झाल्याने लोकांची कोरोनाविषयीची भिती दूर झाली त्यामुळे त्याचा फारसा परिणाम दिसला नाही. त्यामुळे मंगळवार आठवडी बाजार दिवस असूनही  दिवसभर काटीसह परिसरातील गावांमध्ये शुकशुकाट दिसून आला. गावातील सर्व दुकाने  बंद ठेवून शेतातील  सहवनभोजनाचा सर्वानी आनंद  लुटला.  

मार्गशीर्ष महिन्यातील दर्शवेळ अमावस्या (येळवस) हा ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक आणि वनभोजनाचा आनंद देणारा सण आहे. ग्रामीण भागात येळवशीला शेतकरी व शेतीशी निगडित सर्व कुटुंबीय हजेरी लावतात. मित्र व नातेवाइकांना वनभोजनासाठी खास आमंत्रित केले जाते. आज सकाळपासून शहरांतून गावाकडे येणाऱ्या सर्वच रस्त्यावर गर्दी दिसत होती.परिणामी काटीसह परिसरातील सर्व गावात  दिवसभर शुकशुकाट होता. 


शेतकऱ्यांनी सकाळी कडब्याची खोप करून लक्ष्मी पुजन  व काळ्या आईची ओटी भरुन निसर्ग देवतेला व काळ्या आईला  यंदा रब्बी हंगामातील पिके बहरु दे, धनधान्याने आपले कुटुंब सुखी व समृद्ध होऊ दे अशी प्रार्थना करण्यात आली. पाच पांडवांची पुज्या झाल्यानंतर सहभोजनासाठी खास आमंत्रित केलेल्या नातेवाईक, मित्रमंडळी, शेजारीपाजाऱ्यांसह बालगोपाळांनी महिलांनीही वेळ अमावस्येनिमित्त खास बनविलेले बाजरी व ज्वारीचे उंडे, विविध भाज्यांची केलेली एकत्रित भज्जी,बाजरीच्या भाकरी, ताकात ज्वारीचे पीठ कालवून तयार केलेले अंबिल, यासह आपणास जमेल तसे गव्हाची खीर, वरणभात, खिचडी, धपाटे, तिळाची पोळी, मेथीचे पराठे अशा विविध रानमेव्याचा बळीराजासह आवर्जून निमंत्रण दिलेल्या मित्रमंडळी व नातेवाईकांनी सहवनभोजनाचा मनमुराद आस्वाद घेतला. यावर्षी खरीप  हंगामाच्या काढणीच्या वेळी भरपूर पाऊस झाल्याने रब्बीच्या पेऱ्यात वाढ झाली व सध्या ग्रामीण भागात रब्बीचे पीके जोमात दिसत असल्याने यंदा कोरोनात सुध्दा उत्साहाचे वातावरण दिसून आले.


आयुष्यभर काळ्या आईची अविरत सेवा करणाऱ्या तुळजापूर तालुक्यातील पिंपळा (बु.) येथील उत्तमराव बबू नरवडे व सौ साळूबाई उत्तमराव नरवडे वृध्द दाम्पत्यांचा विठ्ठल नरवडे परिवाराच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वेळ अमावस्या निमित्त सत्कार करण्यात आला.   बळीराजाकडून सायंकाळीची उत्तरपुजा करून वेळ अमावस्याची सणाची सांगता करण्यात आली.

 
Top