जळकोट, दि. 07 : मेघराज किलजे
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दोन पॅनलमध्ये सरळ मुकाबला असून, एक अपक्ष उमेदवार दोन वॉर्डातून आपले नशीब आजमावत आहे. प्रचार धूमधडाक्यात सुरू असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. वार्ड रचना नव्याने झाल्याने या नव्या वार्ड रचनेचा कोणाला फटका बसणार ? याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
कोरोना पार्श्वभूमीवर मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींना मुदतवाढ मिळाली होती. या मुदत वाढीनंतर निवडणूक आयोगाने या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याने आता ग्रामपंचायतीची निवडणूक अंतिम टप्प्यात येत आहे. जळकोट ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. या ग्रामपंचायतीवर कै. विठ्ठलराव पाटील, माजी सरपंच बंकटराव कदम, तुळजाभवानी कारखान्याचे संचालक अशोकराव पाटील यांच्यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य गणेशराव सोनटक्के यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचे गेल्या वीस वर्षापासून एकतर्फी सत्ता आहे.
या निवडणुकीत ग्रामविकास पॅनेलचे नेतृत्व गणेश सोनटक्के हे करत असून, महाविकास आघाडीचे अशोक पाटील हे नेतृत्व करत आहेत. अशोक पाटील हे स्वतः मैदानात उतरले असून वार्ड क्रमांक पाच मधून त्यांनी रणशिंग फुंकले आहे. दोन्ही पॅनल कडून नव्या दमाचे शिलेदार असून, निवडणुकीचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे. या निवडणुकीत पूर्वीपेक्षा नवी वार्ड रचना झाल्याने मतदार विखुरले गेले आहेत. कोणता वार्ड कोणाचा बालेकिल्ला होणार? हे सांगणे सध्या तरी कठीण आहे.
वार्ड रचनेचा पॅनेलला फटका बसणार आहे. कोणत्या पॅनलला फायदा होणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या निवडणुकीत दोन पॅनल मध्ये सरळ मुकाबला होत आहे. सामाजिक कार्यकर्ते संजय रेणुके हे अपक्ष म्हणून वार्ड क्रमांक ५व ६ मध्ये नशीब आजमावत आहेत. त्यांनी यापूर्वी विधानसभा, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणूक लढवली आहे. एकाच उमेदवाराने दोन वार्डमध्ये उमेदवारी टाकल्याने त्यांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. जळकोट ग्रामपंचायतीसाठी १७ जागेसाठी ३६ उमेदवार रिंगणात आहेत.
सध्यातरी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्या आरोपांना उत्तर कसे देतात. याकडे जनतेचे कान टवकारले आहेत. राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या जळकोट ग्रामपंचायतीवर सत्ता कोणाची येणार? हे पाहणे जरुरीचे आहे.