चिवरी, दि. 07 : नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हतबल झाला असून, दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली असून, विविध रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे. यामुळे रब्बीच्या पिकांना धोका निर्माण झाला असून पावसाच्या शक्यतेने काढणी केलेली तुर खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या अडचणी मध्ये सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. कधी ओला दुष्काळ कधी अतिवृष्टी तर कधी अवकाळी यामुळे हातातोंडाशी आलेले पीक जात आहे. यामुळे वर्षभराचे केलेले आर्थिक नियोजन बिघडत असून गत वर्षी परतीच्या पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घातल्याने शेतातील उभी पिके आडवी झाली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुस्कान झाली, आता खरीपाचा फटका सहन करून बळीराजाने पुन्हा रब्बीची तयारी केली, आता पिके जोमात असताना पुन्हा निसर्गाचा चमत्कार दिसू लागला आहे.
एकंदरीत जिल्ह्यात शेत पिके जोमदार आले असून ढगाळ वातावरणामुळे या पिकावर विविध रोगांची बाधा झाली आहे, त्यातच रोज पावसाळी वातावरण तयार होत आहे, अवकाळी पाऊस झाला तर गहू ज्वारी हरभरा, काढणीला आलेली तूर या पिकांना मोठा फटका सहन करावा लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.