जळकोट : मेघराज किलजे 

येथून जवळच असलेल्या जळकोटवाडी (नळ) गावची ग्रामपंचायतची पंचवार्षिक निवडणूक होत असून  दोन पॅनल मध्ये अटीतटीची लढत होत आहे. नऊ जागेसाठी १८ उमेदवार निवडणुकीच्या फडात उतरले आहेत. गाव विकासाच्या मुद्द्यावर हि निवडणूक  लढवली जात असून , या गावची अटीतटीचे झुंज पाहायला मिळत आहे.

जळकोटवाडी(नळ) ग्रामपंचायत निवडणूक दोन्ही पॅनल ने प्रतिष्ठेची केली आहे. बिनविरोध निवडीचे प्रयत्न फसल्यानंतर दोन पॅनल आमनेसामने उभे राहिले आहेत. यात सरपंच म्हणून अनेक दशकांचा अनुभव असलेले माजी सरपंच शिवाजीराव काळे यांच्या नेतृत्वाखाली ग्राम विकास पॅनल मैदानात उतरले आहे. काळे हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते असून शैक्षणिक संस्था काढून गावची प्रगती केली आहे. एकेकाळी गावाला जाण्यासाठी पाऊलवाट होती. या पाऊलवाटेचे रूपांतर डांबरीकरण करून गावाला दळणवळण सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून पाच वर्षाचा अपवाद वगळता शिवाजीराव काळे यांनी सत्ता आपल्याकडे राखण्यात यश मिळवले आहे. 

या पंचवार्षिक निवडणुकीत ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून जनतेसमोर जात आहेत. ग्राम विकास पॅनल मधून वार्ड क्रमांक एक मधून वसंत पवार, प्रकाश राठोड, गोगलाबाई राठोड, वार्ड क्रमांक दोन मधून विद्यमान सरपंच सौ. चंद्रकांता वागदरे, जयश्री कदम, सुनिता कांत राठोड तर वार्ड क्रमांक ३मधून रमेश काळे, पवित्रा सोमवंशी, राणी ज्ञानेश्वर कदम हे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तर माजी उपसरपंच शिवाजी बाबुराव कदम हे सक्रिय राजकारणात असून यापूर्वी सत्तेवर असताना विविध कामे त्यांनी केली आहेत. शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ते परिचित आहेत. 

या पंचवार्षिक निवडणुकीत शिवाजी कदम यांनी खंडेराया ग्रामविकास पॅनलद्वारे निवडणुकीच्या फडात आपली शिलेदार उतरवले आहेत. या पॅनेलमधून वार्ड क्रमांक एक मधून सुभाष पवार, शेषेराव राठोड, सौ.सामका बाई चव्हाण, वार्ड क्रमांक दोनमधुन शिवाजी बाबुराव कदम,सौ. पूजा साळुंखे,सौ. सविता राठोड सर वार्ड क्रमांक ३मधून नागनाथ साळुंके,सौ. मंगल जाधव व सौ. विमल पवार हे उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले असून मागील पाच वर्षांपूर्वीची पुनरावृत्ती या निवडणुकीत होणार का? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. 

सध्या दोन्ही पॅनल कडून प्रचार शिगेला पोहोचला असून घरभेटी, कॉर्नर बैठका व प्रत्यक्ष मतदारांशी संपर्क केला जात आहे. दोन्ही पॅनलकडून  सोशल मीडियाचा वापर करून प्रचार केला जात आहे. या निवडणुकीत विद्यमान सरपंच सौ. चंद्रकांता वागदरे या  पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. तर माजी उपसरपंच शिवाजी बाबुराव कदम हे पुन्हा एकदा दंड थोपटून रणांगणात उतरले आहेत. शिवाजीराव काळे हे रणांगणाच्या बाहेर राहुन नेतृत्व करत आहेत. एक जुने नेतृत्व तर एक युवा नेतृत्व यांच्यामध्येच खरी लढाई आहे. 

गावकरी नव्या -जुन्या मधून कोणाला निवडणार  हे प्रत्यक्ष प्रत्‍यक्ष मतदानानंतर कळणार आहे. या गावच्या ग्रामपंचायतीच्या खमंग चर्चा सध्या ऐकावयास मिळत आहेत. या गावची मतदार संख्या १४५० आहे. एकंदरीत जळकोटवाडी गावची निवडणूक दोन पॅनलमध्ये अटीतटीची होत असून , दोन्ही गटाकडून प्रचार जोरात सुरू आहे. नव्या दमाच्या शिलेदारांना मतदार साथ देणार की? जुन्या नेतृत्वाचा जनता स्वीकार करणार? याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.


 
Top