नळदुर्ग : एस.के.गायकवाड
नळदुर्ग-अक्कलकोट रोडलगत असलेल्या खुदावाडी शिवारात नळदुर्ग येथील ऊस उत्पादक शेतकरी किरण पाटील यांच्या शेतातील ऊसतोड करणाऱ्या एका तरुण ऊसतोड मजुराचा विहिरीत पडून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार दि. 8 जानेवारी राेजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. मयत विनोद राठोड हा चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवाशी आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पोटाची खळगी भरण्यासाठी नानकपटार माणिकगड ता. जेवती जि. चंद्रपुर येथून गोकुळ माऊली शुगर्स तडवळ ता.अक्कलकोट जि. सोलापूर मार्फत किरण पाटील यांच्या शेतातील ऊस तोडण्यासाठी आलेल्या ऊसतोड कामगारापैकी तरुण ऊसतोड कामगार विनोद परशु राठोड (वय २६ वर्ष) हा दि. ८ जानेवारी रोजी दुपारी चार वाजण्याच्या च्या सुमारास किरण पाटील यांच्या शेतजमिनी लगत असलेल्या शेतातील अप्पु पाटील यांच्या विहिरीत पाणी पिण्यासाठी गेला असता विहिरीत पडून पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.
सदर घटनेची माहिती मिळताच नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन मयताचा पंचनामा केला. सदर घटनेची आकस्मित मृत्यु म्हणून नोंद करून मयत ऊसतोड कामगाराचे प्रेत शवविच्छेदनासाठी जळकोट ता. तुळजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविले आहे. या घटनेमुळे नळदुर्ग, वागदरी व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.