काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील रहिवासी तथा बार्शी पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस नाईक अभिजित अभिमान गाटे यांनी आज पर्यंत नागरिकांच्या, शेतकऱ्यांच्या व्यदना व समस्येंशी निगडित पन्नास कवितेचे सादरीकरण केले असून "विठ्ठला काय हवंय तुला, जरा सांगशील का मला" ही शेतकऱ्यांवरील अतिवृष्टीसारख्या अस्मानी व कोरोना विषाणू सारख्या सुलतानी संकटावरील कविता महाराष्ट्र पोलीस वर्दीतील सलाम या फेसबुक पेजवर व्हायरल झाली. आणि या कवितेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. "विठ्ठला" ही कविता 3.1 मिलियन लोकांनी पाहिली असून दोन लाख लोकांनी या कवितेला लाईक केले आहे. तर दहा हजार लोकांनी कमेंट्स केल्या आहेत व नऊ हजार शंभर लोकांनी शेअर केली आहे.
मुळचे शेतकरी कुटुंबातील असणारे पोलीस नाईक अभिजित गाटे यांनी विविध कवितेतून शेतात काबाडकष्ट करणाऱ्या आणि शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या वास्तविकेतेचा आधार घेत शेतकऱ्यांच्या वेदना मुखर करुन एकूणच मराठी कवितेत पोलीस खाकीतील या कवीने एक वेगळा ठसा उमटवून अनेकांची वाहवा मिळवली.पोलीस नाईक गाटे यांच्या कविता लेखकाबरोबरच कविता सादरीकरणाच्या अप्रतिम शैलीमुळे महाराष्ट्रसह दिल्ली, कर्नाटक, हैद्राबाद आदी ठिकाणांहून फोनद्वारे अभिनंदन केले असून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून ते शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांपर्यंत त्यांची कविता पोहचली आहे.
विठ्ठला या कवितेतून शेतकऱ्यांवर येणाऱ्या अतिवृष्टीसारख्या अस्माणी व कोरोना विषाणू सारख्या सुलतानी संकटांविषयी विठ्ठलाला हे विठ्ठला काय हवंय तुला!कष्टाने उभे केलेलं पीक डोळ्यादेखत वाहत जात असताना काय वाटत असेल रे मला! गारपीट गेली कोरोना आला कोरोनातच तु पाऊस धाडला, माझ्या आशेचा फड तु पाण्यात गाडला!! हे विठ्ठला काय हवंय तुला, सांगशील का मला!! असा जाब विचारला आहे.
शेतकऱ्यांच्या व्यथा-वेदनांबरोबर त्यांचे गुणदोष, शेतकऱ्यांवर येणारे संकटे यांच्यासह संपूर्ण कृषिजीवन पोलीस नाईक अभिजित गाटे यांनी " विठ्ठला"कवितेत विविध बारकाव्यांसह सादरीकरण केल्याचे दिसते.जागतिकरणाच्या झपाट्यात उद्ध्वस्त होत जाणाऱ्या शेती व्यवस्थेचे चित्रण त्यांच्या कवितेत येते. शेतकऱ्यांवर अस्माणी आणि कोरोना सारख्या सुलतानी संकटांना निमुटपणे सहन करणाऱ्या शेतकऱ्यांविषयी आदरयुक्त भावना व्यक्त करुन त्यासंबंधीचा जाब विठ्ठलाला विचारल्याचे दिसते. कृषीसंस्कृतीशी अतूट नाते असणाऱ्या शेतकऱ्यांसंबंधीच्या आदरयुक्त भावना व्यक्त होणाऱ्या पोलीस नाईक अभिजित गाटे विठ्ठला या कवितेचे सर्वत्र कौतुक होत आहे.