उस्मानाबाद : येथील कर्मवीर बालमंदिर येथे डॉ. मामासाहेब जगदाळे जयंती सप्ताहास प्रारंभ करण्यात आला या सप्ताहाचे उद्घाटन सुप्रसिद्ध कवी प्रा. डॉ. अरविंद हंगरगेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
या प्रसंगी आपले विचार मांडताना हंगरगेकर म्हणाले की, कर्मवीर मामासाहेब यांच्या रुपाने बहुजन समाजातील अज्ञान दूर करणारा ज्ञानसूर्य पृथ्वीतलावर उगवला आणि खऱ्या अर्थाने बहुसंख्य सामान्यांना शिक्षणाची द्वारे खुली झाली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत मामासाहेबांनी समाजातील तळागाळापर्यंत शिक्षणाची गंगा नेवून पोहचवली. मामासाहेबांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करणे ही काळाची गरज आहे. मामासाहेबांच्या विचारांना कृतीची जोड देणे हेच खरे त्यांना अभिवादन ठरेल असे विचार त्यांनी मांडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपातून डॉ. रूपेशकुमार जावळे यांनी प्राथमिक शिक्षकच खऱ्या अर्थाने नव्या पिढीचा निर्माता असतो हे समजावून सांगितले. कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या विचाराला समाजात रुजविण्यासाठी प्रयत्न करणेही गरजेचे असल्याचे जावळे यांनी सांगितले. प्रमुख उपस्थितीत सोलापूर येथील सहशिक्षक मुजावर हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्री रमेश पवार यांनी केले तर सहशिक्षीका श्रीमती तौर एस एम यांनी आभार मानले. कार्यक्रमाला यावेळी शाळेतील श्रीमती वाघे एन ए श्रीमती गुत्तेदार एस एच श्रीमती कोकाटे एम बी श्री सोमवंशी एन एम श्री साठे आर एन उपस्थित होते.