नळदुर्ग , दि.१५
समाजात सांस्कृतिक बदल घडवूनन समाज एकसंघ बांधण्यासाठी सामाजिक सुधारणेच्या कार्यात महत्त्वपूर्ण योगदान देणारे थोर समाज सुधारक संत सेवालाल महाराज यांची जयंती तुळजापूर तालुक्यातील चिकुंद्रा येथील श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालयात विविध कार्यक्रमाने साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक पांडूरंग पवार तर प्रमुख वक्ते म्हणून सहशिक्षक तथा शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष भैरवनाथ कानडे हे होते.
समाज जागृतीच्या कार्यासाठी भजन-कीर्तन या माध्यमाचा आधार घेत भटकंती करणाऱ्या समाजाला स्थिर होण्यासाठीआपल्या प्रभावी वाणीने शिक्षणाचा उपदेश करण्याचा प्रयत्न संत सेवालाल महाराजांनी केला आहे. सामाजिक समतेसाठी स्त्री-पुरुष समानतेचा व सामाजिक न्यायाचा आग्रह धरणाऱ्या सुधारणावादी संत सेवालाल महाराज यांच्या विचाराची आज समाजाला गरज असल्याचे मत शिक्षक भारतीचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष भैरवनाथ कानडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
प्रारंभी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी संत सेवालाल महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित सहशिक्षक एम.डी. गरड मुख्याध्यापक पांडूरंग पवार , यांनी आपले विचार व्यक्त केले.तर शिक्षक वामन चव्हाण यांनी गोर बंजारा भाषेतून भजन सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षक महादेव गरड यांनी केले .