काटी ,दि.२४ : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील बॅंक ऑफ महाराष्ट्रचे शाखाधिकारी अभिषेक कुमार यांनी संसर्गजन्य वाढत्या कोरोनामुळे सोमवार दि. 22 पासून बॅंक ग्राहकांना मास्क वापराचे महत्व पटवून देण्यासाठी 'मास्क नाही तर प्रवेश नाही' अभिनव मोहीम सुरू करण्यात आली.
बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या तामलवाडी शाखेने राबविलेल्या कोव्हीड प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी मास्क नाही तर प्रवेश नाही या मोहिमेला बॅंक ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला.
राज्यात सध्या वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्र्वभूमीवर बॅंक ग्राहकांना मार्गदर्शन करताना शाखाधिकारी अभिषेक कुमार म्हणाले की, मास्कचा नियमित वापर हाच सध्यातरी कोरोनापासून बचावाचा सर्वोत्तम मार्ग असल्याचे सांगून नागरिकांनी मास्कचा नियमित वापर करणे, एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवणे, तसेच वारंवार हात धुणे ही त्रिसूत्री कोरोनाला आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी महत्वाची असल्याचे सांगितले.
या मोहीमेअंतर्गत तामलवाडी, धोत्री, पिंपळा,गंजेवाडी, देवकुरुळी येथील बॅंक ग्राहकांना मास्क घालून येण्याच्या सुचना देऊन मास्क वापराचे महत्व,मास्कचा वापर कशा पध्दतीने करावा, हात वारंवार धुण्याचे फायदे, सुरक्षित अंतर का ठेवावे याविषयी व्यापक जनजागृती करण्यात आली. शाखाधिकारी अभिषेक कुमार यांनी राबविलेल्या या मोहिमेला ग्राहकांनी प्रतिसाद दिला.
यावेळी बॅंक कर्मचारी मेघा घारिया, सुशील भोसले, नितीन बनसोडे, वायचळ यांच्यासह बॅंक ग्राहक उपस्थित होते.