काटी, दि. १५ :
तुळजापूर तालुक्यातील धोत्री येथील शांतीदूत तरुण मंडळाच्या वतीने बुधवार दि.17 रोजी सायंकाळी 6 वाजता माता रमाई आंबेडकर चौकात माता रमाई आंबेडकर यांच्या 123 व्या जन्मोत्सवानिमित्त त्याग मुर्ती रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माता रमाई आंबेडकर भवनाचा नामकरण सोहळा आणि महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मुर्तीच्या अनावरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ.कौस्तुभ दिवेगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड, तहसीलदार सौदागर तांदळे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे,तुळजापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत मरोड, समाज कल्याण अधिकारी चौगुले, पंचायत समिती सदस्य शिवाजी साठे, तामलवाडी पोलीस ठाण्याचे सपोनि सचिन पंडित, बॅंक ऑफ महाराष्ट्रचे शाखाधिकारी अभिषेक कुमार, सरपंच अश्विनी साठे, ग्रामसेवक भिमराव झाडे, वसुली अधिकारी नितीन बनसोडे, तलाठी सौ. अंकुश आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ.कौस्तुभ दिवेगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड प्रथमच धोत्री गावात येत असल्याने कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे.
या सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शांतीदूत तरुण मंडळाच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष दत्ता उबाळे, उपाध्यक्ष सुरज मस्के यांनी केले आहे.