वागदरी,दि.१९:एस.के.गायकवाड
प्रत्येक माणसाच्या अंगी जीवन जगण्याची एक कला असते. समाजामध्ये अनेक कलावंत आहेत. अनेक प्रकारच्या लोककला आजही जिवंत आहेत.चित्रपट निर्मितीचे तर एक वेगळे विश्वच आहे.त्यात संगीत गायन ही कला अनादिकालापासून आजही जिवंत आहे.
केवळ आपल्या सुमधूर वाणीतुन गीत गायन करून आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारे लता मंगेशकर ,अनुराधा पौडवाल, प्रल्हाद शिंदे, वामन दादा कर्डक, विठ्ठल उमप ,शिंदे शाही, कडुबाई खरात असे कितीतरी मराठी, हिंदी गीते गाणाऱ्या नामवंत गायकांची नावे सांगता येतील.हे जरी खरे असले तरी ही ज्यांना माध्यमा पर्यंत पोहचता येत नाही. योग्य विचार पीठ किंवा स्टेज मिळत नाही , जे प्रसिद्धी पासून कोसो मैल दूर आहेत असे कितीतरी कलावंत आहेत की रस्त्यावर बसून आपल्या कलेचे सादरीकरण करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
त्यापैकीच एक कलावंत म्हणजे रहेमत ताज होय. पंचरंगी गायक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणारा रहेमत ताज हा मुळचा नागपूर येथील कलमान मार्केटच्या पाठीमागे असलेल्या चिखली वस्तीत राहणार असून दि.१८ फेब्रुवारी रोजी नळदुर्ग बसस्थानकाजवळ, नळदुर्ग-अक्कलकोट रोडवर ना स्टेज ना मंडप ना कोणाचे निमंत्रण नसताना अचानक विंंचवाचे बिराड पाठीवर म्हटल्याप्रमाणे आपले बायको लेकरासह बिराड उतराविले. पाच मिनिटांतच रोडच्या कडेला लोकांची गर्दी जमेल अशा ठिकाणी साउंड सिस्टीमची मांडणी केली. बायको, दोन लहान बहिणी आणि तिन लहान मुल अस त्यांच कुटुंब. स्वतः बँजो वाजवत शेर शाहीरी म्हणत गीत गायनला सुरुवात केली तर बायको व दोन्ही बहिणीची ढोलकी वरील थाप त्यांच्या गायनाला संगीताची जोड लावली बघता बघता लोकांची गर्दी जमली आणि संगीत महिफिल सुरू झाली.
समाज प्रबोधनपर कव्वाली, भारदस्त भिमगीते, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिवन चरित्रावर अधारीत गीते, शिर्डी साई बाबावरील गीते सादर करून या कलापथकानी प्रेक्षकांची मने जिंकली.
आपोआपच प्रेक्षकांच्या खिशातून दहा, वीस,पन्नास आणि शंभर रूपयांच्या नोटा बाहेर येऊ लागल्या.गीतांची आँफर होऊ लागली. दोन तीन तास ही संगीत महिपील रंगली. त्यांच्या कलेची कदर लोकांनी केली. भरभरून आर्थिक मदत झाली.
आणि संध्याकाळच्या भाकरीची सोय झाली.कार्यक्रम संपला लोकांची गर्दी ओसरली .
अशा प्रकारे या कलापथकाची दिनचर्या अखंडपणे चालू आहे. आज इथे तर उद्या तिथे अस करत विदर्भ आणि मराठवाड्यात हे कलापथक आपली पोटाची खळगी भरण्यासाठी भ्रमण करीत आहे. त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,उपजतच त्यांच्याकडे गीत गायनाची कला आहे. गीत गायन हा आमच्या कुटुंबातील पिडीजात व्यवसाय आहे.वडील,आजोबा पासुन ही कला आमच्या कुटुंबात अनुवंशिकच झाली आहे असे म्हटले तरी चालेल. शिक्षण जेमतेम, त्यामुळे नौकरी नाही. उत्पन्नाचे दुसरे साधन नाही.रस्त्यावरची संगीत महिफिल हेच आमच्या जगण्याचे साधन आहे.