उमरगा, दि.२२ :
छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेत महसुली व्यवस्था, प्रशासकीय सुव्यवस्था, न्यायदान, कडवी शिस्त, प्रजाहित दक्षता, नीतिमूल्ये, पारदर्शक राज्यकारभार, गमिनी कावा आणि कार्यक्षम प्रशासन हे ठळक वैशिष्ट्ये जाणवतात.
शिवाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल काळामध्ये जो इतिहास रचला आणि इतिहास घडविला तो खरा इतिहास जनतेसमोर मांडण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन असे प्रसिद्ध इतिहास तज्ञ डॉ. सतीश कदम यांनी शिवजयंती दिनी केले.
उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथील श्रीकृष्ण महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शिवजयंतीचे औचित साधून ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
यावेळी प्रा. डॉ. श्रीकांत गायकवाड अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य डॉ. दिलीप कुलकर्णी, डॉ. कार्तिक पौळ, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. कदम म्हणाले, की महाराजांनी दाखवलेल्या मार्गाचा अवलंब करत आजही आदर्श राज्याची स्थापना करता येऊ शकेल. शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा आलेख संशोधनाअंती मिळालेल्या पुराव्यानिशी स्पष्ट केला. अध्यक्षीय समारोप प्रसंगी बोलताना डॉ. श्रीकांत गायकवाड म्हणाले की, आधुनिक लोकशाहीचा जेव्हा युरोपमध्ये जन्मही झाला नव्हता तेव्हा शिवरायांनी राजेशाहीला कल्याणकारी लोकशाहीचे अधिष्ठान दिले. रयतेला स्वराज्य, स्वदेश, स्वधर्म, स्वभाषेच्या रक्षणार्थ लढण्याची प्रेरणा दिली.
धर्मनिरपेक्ष जीवनमूल्याचा स्वीकार केला, कायद्यासमोर सारे समान हे तत्व स्वीकारले या घटना नव्या युगाचा प्रारंभ करणाऱ्या ठरतात. त्यांचा लष्करी आणि मुलकी राज्यकारभार आधुनिकतेची साक्ष देणारा ठरतो, त्यापासून आपण प्रेरणा घ्यावयास हवी असे स्पष्ट केले.
याप्रसंगी प्रा. डॉ. किसन लोहार, प्रा. हणमंत भोसले, प्रा. डॉ. दिगंबर चव्हाण, डॉ. मिलिंद सूर्यवंशी, डॉ. भाऊसाहेब ऊगले, डॉ. गुलाब राठोड, डॉ. रमेश मादळे, डॉ. दस्तगीर पठाण, डॉ. एम. जी. अंबुसे, डॉ. कल्याण कदम, प्रा. हणमंत देशमुख, ग्रंथपाल डॉ. अनिल काळदाते, कार्यालयीन अधिक्षक विनोद पतंगे, शिवाजी पाटील, येतीराज कवठे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक डॉ. डी. आर. कुलकर्णी यांनी केले. प्रा. राजाराम निगडे यांनी पाहुण्याचा परिचय करून दिला. प्रा. प्रमोद चौधरी यांनी सूत्रसंचलन तर प्रा. रामदास कोळी यांनी आभार मानले.