उस्मानाबाद,दि.२२
 परंडा येथील पत्रकार , वृत्तपत्र विक्रेते सुरेश घाडगे यांच्या घरावरील दरोडा प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना सोमवारी (दि. २२) निवेदन देण्यात आले आहे. या मागणीची दखल न घेतल्यास पत्रकारांसह नागरिकांच्या वतीने आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.


 निवेदनात म्हटले की, परंडा येथील पत्रकार संघाचे अध्यक्ष  घाडगे यांच्या घरी रविवारी (दि.२१) मध्यरात्री २ ते ३ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी धाडसी दरोडा घातला.  घाडगे यांच्या कुटुंबियास बंदूक, चाकू, शस्त्रांचा धाक दाखवून सोने,चांदी, दागिन्यासह रोख रक्कम लुटून नेली. या घटनेने पत्रकार व शेत वस्तीवरील कुटुंबिय भयभीत आहेत.

 त्यामुळे या दरोड्याच्या गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक करून चोरी गेलेला मुद्देमाल घाडगे यांना तातडीने मिळवून द्यावा, अन्यथा पत्रकारांसह नागरिकांच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 


यावेळी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली पत्रकारांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी व अपर  पोलीस अधीक्षक संजय पालके यांच्याशी या प्रकरणाविषयी चर्चा करून निवेदन दिले. पत्रकार संघाचे सहसरचिटणीस राजाभाऊ वैद्य, जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत कदम, तालुकाध्यक्ष गौतम चेडे (वाशी), सुभाष कदम (उस्मानाबाद), पत्रकार विनोद बाकले, संतोष शेटे, तुषार चव्हाण, भागवत शिंदे, जयराम शिंदे, सुरेश कदम, शिवशंकर तिळगुळे, शाहरूख सय्यद, दादासाहेब रिटे, संतोष जोशी, मच्छिंद्र कदम, छायाचित्रकार इस्माईल सय्यद, किशोर माळी आदींची उपस्थिती होती.
 
Top