जळकोट,दि.८: मेघराज किलजे तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी या निवडणुकीत बहुजन महाविकास आघाडीचे नेतृत्व करणारे काँग्रेसचे अशोकराव पुंडलिकराव पाटील यांची तर उपसरपंच पदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौ. श्रीदेवी बसवराज कवठे यांची बिनविरोध निवड झाली. जळकोट ग्रामपंचायतीवर वीस वर्षानंतर चेहरा बदल झाला आहे.
जळकोट ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक अत्यंत चुरशीची होऊन बहुजन महाविकास आघाडीला१७पैकी ११ जागा मिळाल्या होत्या. विरोधी ग्रामविकास पॅनलला सहा जागा मिळाल्या होत्या. गेल्या वीस वर्षापासून माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश सोनटक्के यांची एकहाती सत्ता होती. या सत्तेला यावेळेसच्या निवडणुकीत बहुजन महाविकास आघाडीने जबरदस्त हादरा देऊन , ग्रामपंचायतवर सत्ता काबीज केली आहे.
जळकोट ग्रामपंचायतीच्या सरपंच ,उपसरपंच निवडीसाठी सोमवार(दि.८) रोजी विशेष मासिक सभा ग्रामपंचायत कार्यालयात बोलावण्यात आली होती. ही विशेष मासिक सभा तुळजापूर नगरपरिषदेचे संगणक अभियंता अभंग गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत सरपंच व उपसरपंच निवड प्रक्रिया पार पडली. सरपंच पदासाठी काँग्रेसचे अशोकराव पुंडलिकराव पाटील यांनी दोन नामनिर्देशन पत्र सादर केले. या नामनिर्देशनपत्रावर ग्रामपंचायत सदस्य सौ. दीपा महेश कदम व ग्रामपंचायत सदस्य गजेंद्र हरिदास कदम हे सूचक होते. तर उपसरपंच पदासाठी राष्ट्रवादीच्या सौ. श्रीदेवी बसवराज कवठे यांनी दोन नामनिर्देशनपत्र सादर केले. उपसरपंचपदासाठी ग्रामपंचायत सदस्य अंकुश लोखंडे व ग्रामपंचायत सदस्य जीवन कुंभार हे सुचक होते.
सरपंच व उपसरपंचपदासाठी दोन-दोन नामनिर्देशनपत्र सादर झाल्याने , दोन्ही पदांसाठी एकच अर्ज ग्राह्य धरून सरपंच व उपसरपंच पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली. सरपंच, उपसरपंच पदासाठी दुसरा कुठलाच अर्ज न आल्याने दुपारी दोन वाजता सरपंच म्हणून काँग्रेसचे अशोक राव कुंडलिकराव पाटील यांची तर उपसरपंच म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौ. श्रीदेवी बसवराज कवठे यांची निवडणूक निर्णय अधिकारी अभंग गायकवाड यांनी बिनविरोध निवड जाहीर केली. नूतन सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार केला. या निवड प्रक्रियावेळी ग्राम विकास पॅनलचे ग्रामपंचायत सदस्य सलीम जमादार,सौ. रेखा माने,सौ. गुरुदेवी दरेकर, सय्यद तांबोळी,सौ. शोभा अंगुले,सौ. अंजली छत्रे हे सहा सदस्य गैरहजर राहिले.
या निवड प्रक्रियावेळी बहुजन महाविकास आघाडीचे नूतन ग्रामपंचायत सदस्य गजेंद्र कदम, प्रशांत नवगिरे, सौ. राजश्री कागे, सौ. उज्वला भोगे,सौ. सुरेखा माळगे, कल्याणी साखरे, जीवन कुंभार,सौ. दीपा कदम , अंकुश लोखंडे हे सदस्य हजर होते. त्याचबरोबर ग्रामविकास अधिकारी ए. जे. कोकाटे, तलाठी तात्यासाहेब रुपनवर ,ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
निवडीची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व गुलालाची उधळण करून या निवडीचे स्वागत केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, राष्ट्रवादीचे महेश कदम कृष्णात मोरे, सोसायटीचेअरमन राजकुमार पाटील आदीसह बहुजन महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, युवक, ग्रामस्थ उपस्थित होते.