उस्मानाबाद : येथील सुशीला नगर व संत साईबाबा सोसायटी मधील प्रलंबित मागण्यांचे निवेदन विवेकानंद युवा मंडळ पुरस्कृत नागरिक कृती समितीने जिल्हाधिकारी व नगर परिषद मुख्याधिकारी यांना दिले.
निवेदनात नमूद केले आहे की, जवळ जवळ दहा ते पंधरा वर्षांपासून येथील भागांमध्ये नाल्यांची सोय नाही, रस्ते तर संपूर्णपणे नष्ट झाले आहेत, स्ट्रीट लाईटची देखील सोय नाही. नाली नसल्याने येथे रोगराई पसरल्याचे अनेक वेळा निदर्शनास आले आहे. आयुर्वेदिक दवाखान्यातील सांडपाणी सुशीला नगर मधील खुल्या जागेत सोडण्यात येते, त्यामुळे परिसरात अत्यंत दुर्गंधी पसरलेली दिसत आहे. अनेक वेळा लोकप्रतिनिधी फक्त निवडणुकीच्या वेळी येतात व मोठमोठी आश्वासने देतात, पण दहा ते पंधरा वर्षांपासून येथे प्राथमिक सुविधाच नसल्याने प्रशासन व लोकप्रतिनिधी करतात तरी काय? हाच प्रश्न येथील सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे. यापूर्वीही ओम नगर नागरी कृती समितीने दिलेल्या मागण्यांविषयी मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी त्याबाबत सकारात्मक उत्तरे दिली असून, लवकरात लवकर ओम नगरचे प्रश्न मार्गी लावण्यात येतील, असे मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे यांनी सांगितले.
यावेळी विवेकानंद युवा मंडळ व नागरी कृती समितीचे बाळकृष्ण साळुंके, स्वप्नील देशमुख, समर्थ शिरसीकर, अनिकेत क्षीरसागर, कृष्णा घोलप, सचिन जाधव, अभिजित कोळी, सौरभ धुमाळ, सुरज कोळी आदी युवा कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.