जळकोट,दि.१५: मेघराज किलजे तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील राजे शिवछत्रपती सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने यंदाच्या शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. एका बैठकीत नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली.
जळकोट येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे शिवजयंतीची तयारी बैठक व यावर्षीच्या शिवजन्मोत्सव समिती पदाधिकारी निवडीसाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. राजे शिवछत्रपती सार्वजनिक जन्मोत्सव समिती च्या वतीने व तमाम शिवभक्तांच्या उपस्थितीत जळकोट येथे शिवजयंती साजरी करण्यात येते. या बैठकीत जन्मोत्सव पदाधिकारी निवडण्यात आले. अध्यक्षपदी प्रशांत बिराजदार तर उपाध्यक्षपदी मंगेश सावंत यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर सचिवपदी आनंद करदुरे तर खजिनदारपदी बाळासाहेब राम कदम यांची एकमताने निवड करण्यात आली. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती यांच्या जयंतीदिवशी(दि.१९) जळकोट येथील शिवाजी चौकातील अश्वारूढ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास सकाळी दुग्धाभिषेक करण्यात येणार आहे.
जयंतीनिमित्त सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी सोलापूर येथील दमाणी ब्लड बँक व जन्मोत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती या बैठकीत देण्यात आली. या बैठकीपूर्वी समितीचे आधारस्तंभ कै. किशोर कदम यांना दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या बैठकीस राजे शिवछत्रपती सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे ऍड. सचिन कदम,डॉ. संजय कदम, ब्रह्मानंद कदम, शिवराम कदम, विजय सगर, प्रवीण गंगणे, रवी जाधव, श्रीकांत कदम, सौरभ कदम आदीसह शिवभक्त, ग्रामस्थ व युवक उपस्थित होते.