चिवरी ,दि.२९ : राजगुरु साखरे
कोरोनामुळे अगोदरच दारिद्र रेषेखालील कुटुंब, मध्यमवर्गीयांचे, आर्थिक कंबरडे मोडलेले असताना स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. 

त्यामुळे ग्रामीण भागातील महिला पुन्हा चुलीवर स्वयंपाक करत असल्याचे चित्र दिसत आहे. केंद्र सरकारने उज्वला गॅस योजनेअंतर्गत मोफत गॅस योजना सुरु केली आहे .परंतु ग्रामीण भागातील जनतेमध्ये म्हणावे तेवढा वापर होताना दिसुन येत नाही, कारण आज गॅस सिलिंडरच्या किमतीत खुपच  दरवाढ झाली आहे. आज ग्रामीण भागामध्ये एका गॅस सिलेंडर साठी ८५० रुपयाच्या जवळपास मोजावे लागत आहे. हाच गॅस पूर्वी ४५० रुपयांना मिळत होता, एकंदरीत गॅस सिलेंडर महागल्याने ग्रामीण भागातील महिलांनी गॅसचा वापर कमी करून लाकडाचा वापर करून पुन्हा चुलीवरचा स्वयंपाक करण्यासाठी वळल्याचे  चित्र दिसत आहे.

 त्यामुळे ग्रामीण भागातील महिला नको ते गॅस सिलेंडर, आपली चुलच बरी,' असे म्हणत ' उज्वला ' पुन्हा चुलीवर स्वयंपाक करत असल्याचे चित्र सध्या तुळजापूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळत आहे.
 
Top