तुळजापुर, दि. १४ :

दि. १६ मार्चपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यापीठ स्तरीय परीक्षांना सुरुवात होत असून कोरोना संसर्गाची खबरदारी म्हणून सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना  कोव्हॅक्सींन लस देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने मराठवाडा अध्यक्ष प्रोफेसर डॉ. गोविंद काळे यांनी केली आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने वरिष्ठ महाविद्यालय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी दि.१६ मार्च पासून वरिष्ठ महाविद्यालयाच्या पदवी परीक्षा पार पाडणार आहेत. यावेळी विद्यापीठाने ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारचे पर्याय विद्यार्थ्यांना दिले होते, मात्र ग्रामीण भागामध्ये यापूर्वीच या परीक्षांचा अनुभव आणि  इंटरनेट कनेक्टिव्हिटीची कमतरता लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी ऑफलाइन पद्धतीला पसंती दिली आहे. ८० टक्के पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ऑफलाइन पर्याय निवडला असल्यामुळे कोरोना संसर्गाची खबरदारी घेण्यासाठी  सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ही लस तात्काळ देण्याची मागणी मराठवाडा अध्यक्ष  काळे यांनी या निवेदनामध्ये केली आहे.
 
Top