तुळजापुर, दि. २७: डॉ.सतीश महामुनी

उन्हाळ्याची चाहूल लागल्याने तीर्थ क्षेत्र  तुळजापूर शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये शहरातील पक्षीमित्र तरुणाकडून पक्षासाठी झाडावर पाणपोईची सोय केली आहे.


तुळजापूर शहरातील १८  ते २५ वयोगटातील निसार तांबोळी, पहर्ष बरूरकर , मिलिंद सिरसट, गुरुनाथ कुंभार, संकेत जाधव , शंभू माटे या तरुणांनी उस्मानाबाद येथे १८  पक्षांच्या पाणपोई  आणि तुळजापूर येथे ३०  ठिकाणी  पाणपोई उभारल्या आहेत. हे तरूण तुळजापूर परिसरामध्ये सर्पमित्र,  प्राणीमित्र आणि पक्षी मित्र म्हणून ओळखले जातात. सर्पमित्र , प्राणी मित्र आणि पक्षी मित्र म्हणून काम करत असताना हे तरुण आपल्या स्वतःच्या निधीमधून पोलीस स्टेशन, यशवंतराव महाविद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय, तुळजाभवानी सैनिकी स्कूल, पोलीस लाईन कॉलनी, डी. वाय.एस. पी. ऑफीस, नगरपालिका कार्यालय, विश्वास नगर, तुळजामाता इंग्लिश स्कूल, सारा गौरव परिसर ,तुळजापूर खुर्द, आरदवाडी, वेताळ नगर, घाटशिळ रोड, पापणास तीर्थ  अशा विविध ३०  ठिकाणी पक्ष्यांसाठी पाणपोई उभारल्या आहेत.  

वन्यजीव रक्षक गुरुनाथ कुंभार हा विद्यार्थी उस्मानाबाद येथील शासकीय आयटीआय मध्ये शिक्षण घेत असून त्याने तुळजापूर आणि उस्मानाबाद येथे उन्हाळ्याच्या काळात पक्ष्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या भावनेने ही पाणपोई उभारण्याचा उपक्रम चालवला. सर्पमित्र निसार तांबोळी यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले की, नागरिकांना सर्पमित्र म्हणून आणि पक्षी मित्र म्हणून मदत करण्याचा आमचा स्वाभाविक स्वभाव आहे म्हणून सदैव पक्षी आणि प्राण्यांच्या मदतीला आम्ही मित्र परिवार धावून जातो आणि त्यांना वन्य क्षेत्रातमध्ये मुक्त सोडतो. 

येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये हे विद्यार्थी पानपुरी बसवण्यासाठी आले असता महाविद्यालयाच्या वतीने अधीक्षक पांडुरंग नागणे यांनी या विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन केले. अशा प्रकारचा उपक्रम राबवून पक्षी आणि प्राणी यांना या उन्हाळ्याच्या दिवसात पाणी उपलब्ध करून देण्याचा उपक्रम तुळजापूर शहराचे वेगळेपण दाखवणारा आहे .अशा शब्दात कौतुक केले.
 
Top