तुळजापूर,दि.८,
महिलांनी अन्याय सहन करु नये,आजचे कायदे महिलांच्या सुरक्षेसाठी खूप प्रभावीपणे निर्माण करण्यात आले आहेत. पालकांनी देखील मुलिंना मुलांप्रमाणेच समानतेची वागणूक देणे आवश्यक
असल्याचे मत ॲड.अंजली साबळे यानी व्यक्त केले.
तुळजापूर येथिल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालयात महिला सक्षमीकरण व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दीनानिमित्त महिलांसाठी आरोग्य व कायदेविषयक मार्गदर्शन या विषयावर शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी ॲड . साबळे या बोलत होत्या.
पुढे त्या म्हणाल्या की, पिडीत अल्पवयीन मुलां मुलींसाठी साक्ष देण्यासाठी कायद्याने ३० दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे, कोणत्याही दबावाच्या वातावरणात आज साक्ष नोंदवली जात नाही, पिडीतांना विश्वासात घेऊनच साक्ष नोंदवली जाते. मोबाईलचा वापर हा ज्ञानवृध्दीसाठी होणं गरजेचं आहे.अन्यायाच्या विरोधासाठी महिलांनी एक संघ असणे आवश्यक आहे, आणि आवश्यक तिथेच कायद्याचा वापर होण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य डॉ.एस.एम.मणेर, डॉ.कार्तिक यादव, ॲड.अंजली साबळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने झाली.
याप्रसंगी तुळजापूर येथील स्त्रीरोग तज्ञ डॉ.कार्तिक यादव यांनी
बोलताना म्हणाले की,आज विसंगतीचा काळ आहे, स्त्रीयांवर पूर्वी चूल आणि मूल एवढीच जबाबदारी होती, परंतु काळानुरुप आज ही संकल्पना बदलत चालली आहे.आज स्त्रीयांवरील जबाबदारी वाढली आहे कारण त्या मोठ्या प्रयत्नाने चूल,मूल आणि नौकरी करुन घर ही संभाळत आहेत.परंतु स्त्री समाज आजही पूर्णपणे आर्थिक सक्षम नाहीत,आज मितिला भारतीय संस्कृती, कुटुंब व्यवस्था सांभाळून स्त्री मुक्तीची चळवळ उभी रहाणे आवश्यक आहे.
महिलांनी स्वतःला सक्षम करणे आवश्यक आहे,स्वतःच्या व्यक्तिमत्वा मध्ये एक सकारात्मक बदल घडवून आणत असताना योग्य पेहराव, योग्य आहार, आणि योग्य त्यावेळी नकार देणे या गोष्टी आत्मसात करणे गरजेचे आहे.सोशल मिडीयाचा वापर हा मुलींकडून सद-सद विवेक बुध्दीने होणे आवश्यक आहे, महिलांनी आपल्या व्यक्तिमत्वास पुरक अशा प्रकारचे एक वर्तुळ आखणे तसेच या वर्तुळामध्ये इतर असंबध्दीत तत्वांच्या प्रवेशावर बंदी घालणे गरजेचे आहे.आणि शेवटी परिवाराचा विश्वास टिकवण्याचा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, मुलिंनी बाणेदारपणे शिक्षण घेऊन स्वावलंबी बनले पाहिजे, जिवनात कोणती न कोणती कला आत्मसात केली पाहिजे,म्हणजे परावलंबी रहाण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख प्रा.चव्हाण व्ही.एच, प्रा.डॉ.एस.एम.देशमुख, रासेयो प्रमुख प्रा.जे.बी.क्षीरसागर, प्रा.के.एस.कदम ,प्रा.आशपाक आतार यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.सी.आर दापके यांनी तर सूत्रसंचालन प्रा.श्रीमती एस.एम.कदम यांनी आभार तांबोळी यांनी मानले.
कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थिनी तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते.