तुळजापुर, दि. १८ : डॉ. सतीश महामुनी
उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्रकल्पाला आगामी तीन दिवसात लिक्विड आणि इतर आवश्यक साधनसामग्री दिली जाईल असे आश्वासन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी धैर्यशील पाटील याना दिले आहे. त्यामुळे उस्मानाबाद येथे ऑक्सिजन निर्मिती असणारी मोठी अडचण दूर होऊन अडचणीच्या काळात रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन मिळण्याची शाश्वती निर्माण झाली आहे.
तामलवाडी ता.तुळजापूर येथील ऑक्सिजन प्रकल्पाला भेट दिल्यानंतर धैर्यशील पाटील यांनी भ्रमण दूरध्वनीवरून आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे संपर्क केला आणि उस्मानाबाद आणि तुळजापूर येथील अडचणीच्या अनुषंगाने चर्चा केली.
आरोग्य मंत्र्यांनी उस्मानाबादच्या या आपत्कालीन परिस्थितीमध्ये राज्य सरकारच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
तामलवाडी येथील ऑक्सिजन प्रकल्पास राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष धैर्यशील पाटील , तहसीलदार सौदागर तांदळे यांनी भेट देऊन कोरोनाच्या आपत्तीच्या काळात पुरवठा योग्य प्रमाणात पाणी उपलब्ध करण्याची विनंती प्रशासनाच्यावतीने करण्यात आली.
कोरोना रुग्णासाठी आवश्यक उपाययोजना आणि औषध उपचार यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदार सौदागर तांदळे यांच्याशी चर्चा करण्यात आली. तेव्हा आरोग्य यंत्रणा या संदर्भात योग्य ती खबरदारी घेत असल्याची माहिती मिळाली.
उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णालयाच्या उपयोगासाठी ऑक्सीजन प्रकल्पाची उभारणी सुरू आहे , मात्र यासाठी आवश्यक असणारे लिक्विड आणि इतर साहित्य याची कमतरता होण्याची बाब उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून मिळाली
राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या बरोबर दूरध्वनीवरून यासंदर्भात चर्चा केली असता आरोग्य मंत्री टोपे यांनी यांनी तीन दिवसांमध्ये ऑक्सिजन निर्मितीसाठी आवश्यक असणारे घटक लिक्विड देण्याची व्यवस्था केली जाईल असे आश्वासन दिले आहे.
याप्रसंगी धैर्यशील पाटील व शहराध्यक्ष अमर चोपदार यांनी तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये शनिवारी ऑक्सिजन सिलेंडरची झालेली कमतरता लक्षात घेऊन भविष्यात रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडू नये ही बाब लक्षात आल्यानंतर तामलवाडी येथील प्रकल्पाला भेट देऊन या अडचणीच्या काळात मदत करण्याची विनंती केली. ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या यंत्रणेकडून उपजिल्हा रुग्णालय व कुतवळ हॉस्पिटल येथे प्रत्येकी ६० व २० सिलेंडर नियमितपणे ८० सिलेंडर पुरवठा करण्याचे आश्वासन मिळाले आहे.
याप्रसंगी शहराध्यक्ष अमर चोपदार, शरद जगदाळे यांची यावेळी उपस्थिती होती.