तुळजापुर, दि. ९ :
महाराष्ट्रातील सर्व मंदिरे आणि दुकाने राज्य सरकारने नियमावली अटी शर्ती लागू करून तात्काळ सुरू करावीत ,या मागणीसाठी छावा क्रांतिवीर सेनेच्यावतीने तुळजापूरचे तहसीलदार सौदागर तांदळे यांना निवेदन दिले.
लॉकडाउनच्या परिस्थितीमुळे तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरावर आधारित पुजारी वर्ग , व्यापारी वर्ग आणि अत्यंत छोटे व्यवसाय करणारे छोटे व्यावसायिक हे सर्व घटक अडचणीत सापडले आहेत. यांच्यावर आज उपासमारीची वेळ आली आहे. या सर्व घटकांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेण्यात यावा, यामध्ये सर्व पुजारी वर्ग यांना जीवनावश्यक वस्तूचे किट वितरित करण्यात यावे, अटी व शर्ती लागू करून मंदिरे व दुकाने तातडीने उघडण्यात यावेत, यासंदर्भात छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना याविषयी निवेदन देण्यात आले.
सर्वत्र अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे राज्य सरकारने आणि महसूल आणि पोलिस खात्याच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात वास्तववादी अहवाल शासनाकडे पाठवावा अशी मागणी या निमित्ताने पुजारी व छावाचे नेते कुमार टोले यांनी केली.
अत्यंत गंभीर परिस्थिती शासनाच्या निर्णयामुळे तयार झाली आहे.
शासनाकडे कोणतेही नियोजन नसताना संपूर्ण लाँकडावुन केलेला निर्णय गोरगरीब जनतेला उपासमारी मध्ये ढकलणारा आहे. तो तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी व्यापारी आणि छावाचे नेते महेश गवळी यांनी केली.